तिरोडा : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढविण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आ. विजय रहांगडाले यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयातसुद्धा खाटांची संख्या वाढवून ऑक्सिजनची सोय कशी करता येईल, याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्यासोबत चर्चा केली. येथील उपजिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत २० बेडपैकी १२ कोविड रुग्ण भरती असून, जिल्हा प्रशासनाकडून १ निरीक्षक, ०६ डॉक्टर, ०४ वॉर्ड बॉय, ६ नर्स, ४ सफाई कर्मचारी, २ धुलाई कर्मचारी, ०१ तांत्रिक कर्मचारी, मोबाइल एक्स-रे मशीन, ईसीजी मशीन उपलब्ध झाल्यास कोविड रुग्णांवर उपचाराची गती वाढविण्यास मदत होणार असल्याचे मेश्राम यांनी आ. रहांगडाले यांना सांगितले, तसेच ५ व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याची माहिती दिली. मागील वर्षीप्रमाणे काेविड तपासणी केंद्रावर पोलीस कर्मचारी व नगर परिषद कर्मचारी उपलब्ध झाल्यास ज्या रुग्णाची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली अशा रुग्णाला त्वरित कोविड केअर केंद्रात विलगीकरण करण्यास मदत होईल. याची त्वरित दखल आ. रहांगडाले यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देत सर्व सोयी- सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्याबाबत ग्वाही दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर पारधी, डॉ. प्रणव डोंगरे, आरोग्यसेविका शिप्रा तिराडे, अधिपरिचारिका सरिता आंबेडारे व कर्मचारी उपस्थित होते.