गोंदिया : मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र होेते. बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट होती. मात्र, रविवारी (दि. ९) रुग्ण संख्येत थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना ग्राफ डाऊन झाला म्हणूून नागरिकांनी बिनधास्त न राहता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनावर मात करता येणे शक्य आहे.
रविवारी जिल्ह्यात ५७४ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ६२५ नवीन रुग्णांची नोंद झाली. ७ बाधितांचा उपचारादरम्यान खासगी व शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मागील आठ दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४११६ वर आली आहे, तर ऑक्सिजन आणि बेडची समस्यासुध्दा बऱ्याच प्रमाणात दूर झाली आहे. एकंदरीत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असली तर नागरिकांनी बिनधास्त न होता पुढील काही दिवस अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,३९,५०८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,१५,७२३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपीड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत १,४२,५२४ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १,२२,३३९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३७,०३६जण कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ३२,३२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ४,११६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ४६६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयाेगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे.
.................
प्रलंबित स्वॅब नमुन्यांची समस्या मार्गी
गोंदिया येथील स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेतील कर्मचारी कोरोना बाधित निघाल्याने नमुने तपासणीवर त्याचा परिणाम झाला होता. प्रलंबित स्वॅब नमुन्यांची संख्या ६ हजारावर गेली होती. मात्र, आता ही संख्या ४६६ वर आली असून, प्रलंबित स्वॅब नमुन्यांचे प्रमाण कमी झाले आहे. नवीन आरटीपीसीआर मशीन कार्यरत झाल्यानंतर ही संख्या पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.
.............
१ लाख ८० हजार नागरिकांना लस
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर अधिक भर दिला आहे. सध्या १३० केंद्रांवरून लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८० हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. यात पहिला डोस घेणाऱ्याचे प्रमाण अधिक आहे.
.............