पोषण आहाराचे निरीक्षण : जि.प. सदस्य गिरीश पालिवाल यांनी केले निरीक्षणुेबोंडगावदेवी : माहुरकुडा प्रभागाचे जि.प. सदस्य गिरीश पालिवाल यांनी जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा माहुरकुडा येथे अनपेक्षित भेट देऊन शाळेच्या परिसर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती तसेच पोषण आहाराचे बारकाईने निरीक्षण केले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळून गोरगरीब विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावे, असे निर्देश त्यांनी भेटीप्रसंगी दिले.गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शिक्षण समितीचे सदस्य गिरीष पालिवाल यांनी ३१ आॅगस्ट रोजी माहुरकुडा येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेला भेट दिली. या वेळी त्यांनी शाळेबद्दल संपूर्ण माहिती उपस्थित शिक्षकांकडून मिळवून घेतली. गेल्या काही दिवसांपूर्वी शाळा समिती व मुख्याध्यापक यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झाला होता. काहींनी शाळेची फाटक लावून शाळा बंदसुद्धा ठेवण्याचा प्रकार करण्यात आला होता. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते. संपूर्ण तालुक्यात चर्चेत असलेल्या माुहरकुडा येथील जि.प. शाळेला जि.प. सदस्य गिरीष पालिवाल यांच्या अचानक भेटीत काय तोडका निघतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.नवनिर्वाचित जि.प. सदस्य पालीवाल यांनी आपल्या पहिल्याच भेटीमध्ये शाळेत उपस्थित शिक्षकांना सक्त निर्देश देऊन शालेय वातावरणात गटबाजी निर्माण करून गावातील वातावरण बिघडवू पाहणाऱ्या शिक्षकांची कदापी गय केली जाणार नाही, अशी ताकीद दिली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करुन त्यांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावे, असे त्यांनी आवर्जुन सांगितले. शाळेतील कार्यरत शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावकऱ्यांशी जवळीक ठेवून सलोख्याचे वातावरण निर्माण करावे, अशा सूचना त्यांनी भेटीप्रसंगी केल्या. भेटीप्रसंगी मुख्याध्यापक कार्यालयीन कामकाजाकरिता अर्जुनी-मोरगावला गेल्याचे हलचल रजिस्टरवरून त्यांच्या निदर्शनास आले. संपूर्ण शाळा परिसराविषयीची माहिती शिक्षकांकडून पालिवाल यांनी अवगत केली. याप्रसंगी तीन खोल्या असलेल्या जुनाट इमारतीमध्ये विद्यार्थी विद्यार्जन करताना दिसले. शाळेच्या मागे लागूनच तलाव असल्याने विद्यार्थ्यांना त्यापासून धोका उदभवू शकतो याची जाणीव ठेवून शाळेची इमारत तसेच आवारभिंत पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे आपण पाठपुरावा करू. शाळेला भौतिक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. कोणताही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक कार्यात आडकाठी निर्माण न करता आनंदमय वातावरणात विद्यार्थ्यांना शिकवावे. गावात विद्यार्थी गुणवंत घडविणे हाच ध्यास शिक्षकांनी घ्यावा, अशा सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढवा
By admin | Published: September 03, 2015 1:32 AM