गोंदिया : तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा पाठ फिरविली व आता उन्ह तापू लागली. मात्र पुरेशे पाणी शेतात असल्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामे सुरूच ठेवली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात धानपिकाची एकूण रोवणी ३७ टक्के झाली आहे. यात प्रत्यक्ष रोवणीचे प्रमाण ३२ टक्के असून आवत्यांचे प्रमाण १३० टक्के असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षी पावसाने वेळोवेळी साथ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे नुकसान सहन करण्याची पाळी आली नव्हती. मात्र यंदा सतत तीन-चार दिवस पाऊस येतो, नंतर वातावरण खुले होते. यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. तरीही हिंमत न सोडता जिल्ह्यातील शेतकरी धाडसाने रोवणीच्या कामात गुंतले आहेत. जिल्ह्यात १७ हजार ५०० हेक्टर रोपवाटिकेचे क्षेत्र आहे. प्रत्यक्षात मात्र १८ हजार ५८१ हेक्टरमध्ये रोपवाटिका करण्यात आली असून याची टक्केवारी १०६ आहे. तर रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७४ हजार ९३५ हेक्टर असून प्रत्यक्ष रोवणी ५५ हजार २३५ हेक्टरमध्ये करण्यात आली असून याची टक्केवारी ३२ आहे. तसेच आवत्यांचे सर्वसाधारण क्षेत्र नऊ हजार ९६५ हेक्टर असून प्रत्यक्ष आवत्या १२ हजार ९३५ हेक्टरमध्ये करण्यात आल्याने यंदा आवत्यांचे क्षेत्र वाढून याची टक्केवारी १३० वर पोहोचली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण रोवणीचे (आवत्या व रोवणी) सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८४ हजार ९०० हेक्टर असून प्रत्यक्ष रोवणी आतापर्यंत केवळ ६८ हजार १७० हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. याची टक्केवारी ३७ टक्के आहे.याशिवाय जिल्ह्यात काही प्रमाणात तृणधान्य, कडधान्य व गळीताचे धान्य लावण्यात आले आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दुबार पेरणीची गरज नाहीकाही दिवसांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका वाळू लागल्या होत्या. त्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट उद्भवण्याची दाट शक्यता होती. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे वळल्या होत्या. मात्र यानंतर आठवडाभर संततधार पाऊस आल्याने रोपवाटिकांना जीवदान मिळाले. लगेच काही शेतकऱ्यांनी थांबलेल्या रोवणीच्या कामांना सुरूवात केली. आता पुरेसा पाणी शेतात आहे. तसेच काही शेतात ओलावा असल्यामुळे दुबार पेरणीचे संकट नसल्याचे जिल्हा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मागील वर्षी नुकसान नाहीजिल्हा कृषी कार्यालयात मागील वर्षी नैसर्गिक संकटामुळे शेतपिकांच्या नुकसानीची व नुकसान भरपाईबाबत विचारणा केल्यावर, मागील वर्षी अशाप्रकारच्या नुकसानीची नोंदच नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
आवत्यांच्या क्षेत्रात यंदा वाढ
By admin | Published: July 29, 2015 1:27 AM