सडक-अर्जुनी : तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमित कर्ज वाटपातील समस्यांसंदर्भात सहकारी व राष्ट्रीयकृत बॅंक व्यवस्थापकांची बैठक शुक्रवारी (दि.२३) येथील तहसील कार्यालयात आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. याप्रसंगी त्यांनी पीककर्ज वाटपाचा आढावा घेत, पीक कर्ज उद्दिष्ट कमी असून, पुढील हंगामात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट वाढवावे, अशा सूचना बॅंक व्यवस्थापकांना केल्या. आतापर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना स्टेट बँकेने १३५ लाभार्थ्यांना ०.८५ कोटी, बँक ऑफ बडोदाने १.१० कोटी, वी.कोकण ग्रा.बँकेने (पांढरी) ६८ लाभार्थ्यांना ०.४२ कोटी, सडक-अर्जुनी शाखेने १४० खातेदारांना १.१० कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रने (सौंदड) १२७ लाभार्थ्यांना ०.८१ कोटी, जिल्हा सहकारी बँकेने ३,९७२ लाभार्थ्यांना १७.२९ कोटींचे हंगामी पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप झाल्याचे सांगण्यात असून, याची कर्ज वाटपाची टक्केवारी ८२ आहे. तालुक्यातील एकूण ४,४४२ लाभार्थ्यांना २१.५७ कोटी रुपये पीककर्ज वाटप झालेले आहे
यावर आमदार चंद्रिकापुरे यांनी, देना बँकेचे विलीनीकरण झाले असल्याने, बँकेचे आयएफएससी कोड व खाते क्रमांक बदल झाल्याने, त्या बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांचे खाते अपडेट करून शेतकऱ्यांना लवकर बोनसची रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले. तालुक्यात एकूण २६,००० खातेदार आहेत. अशात पीककर्ज उद्दिष्ट हे अल्प असून, पुढील हंगामात उद्दिष्ट वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. याप्रसंगी बँक व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना ड्रिप संच, ट्रॅक्टर, रोटावेटर, शेडनेट हाउस, पोहामिल, पंपसेट, राइसमील इत्यादी बाबींकरिता कर्ज मंजूर करू, असे आश्वासन दिले. बँकेतील गर्दी कमी करण्यासाठी अधिक एक काउंटर लावण्याचे, तसेच शेतकऱ्यांना जास्तीतजास्त क्रेडिट कार्ड द्यावे, तसेच शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना, अडथळे निर्माण न करता कर्ज मंजूर करावे, असे निर्देशही आमदार चंद्रिकापुरे यांनी दिले. याप्रसंगी तहसीलदार उषा चौधरी, नायब तहसीलदार खोकले, शिवाजी गहाणे, एफ.आर.टी. शहा, कृष्णा ठलाल, शिवणकर, ईश्वर कोरे यांच्यासह बँकेचे व्यवस्थापक उपस्थित होते.