रावणवाडी : सध्याच्या धान मळणी हंगामात शेतकरी आता शेतकामातील पारंपरिक साहित्यांना मागे टाकत आधुनिक यंत्रांचा वापर करून आधुनिक होत आहेत. बैलांचा वापर करून मशागत केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये आता ट्रॅक्टर उतरला असून मळणीसाठीही यंत्राचा वापर होऊ लागला आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी यंत्रांचा वापर आधी सुरू केल्यावर त्यांच्या मागोमाग लहान शेतकरीदेखील त्याकडे वळला आहे. लहान शेतकऱ्यांसाठी यामागे वाढलेले बैलांचे भाव व वैरणाची टंचाई हे देखील एक कारण आहे. आता बैलांची संख्या कमी होऊन मळणी यंत्रांची मागणी वाढली आहे. पूर्वी शेतकऱ्यांना पेरणीपासून मळणीपर्यंत बैलांची गरज भासत असे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे मोठ्या संख्येत गोधन असायचे. प्रत्येक घरी मुलांना दूध, दही, तूप भरपूर प्रमाणात मिळत असे. कुटुंबात उत्पन्न व शेतीसाठी बैल मिळायचे. पण आता देशी-गावठी गाई पाळण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. गावरान गाईच्या तुलनेत अधिक दूध देणाऱ्या पाश्चिमात्य देशातील संकरित गाई, मुर्रा म्हैस अधिक नफा मिळविण्याचा हेतुने पाळत आहेत. पूर्वी खेडोपाडी कापनी, मळणीनंतर शेतात गुरेढोरे चराईकरिता भरपूर रान मोकळे असायचे. पण आता बहुतांश ठिकाणी सिंचनाच्या सोईमुळे चराई क्षेत्रही फार अल्प झाला आहे. त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बाबींचा परिणामामुळे खेड्यातील गोधन फारच कमी झाले आहे. गार्इंची संख्या फारच कमी झाल्यामुळे शेतकरी आता यंत्राकडे वळला आहे. शेतात ट्रॅक्टरने नांगरणी व पेरणी केली जाते. मळणीसाठी बैलबंडी बैलांची दावन सोडून ट्रॅक्टर, थ्रेसर, हार्वेस्टरचा उपयोग करीत आहेत. यामुळे खर्चही कमी होऊन कामे त्वरित होत आहेत, म्हणून आता शेतकरी यांत्रीक शेतीकडे वळाल आहे. यंत्र्यांच्या वापराने वेळेची बचत होऊन मळणी यंत्राने गहू, हरभरा, धान आदी इतर पिके कमी वेळेत लवकर तयार होतात. विजेवर किंवा डिझेलवर चालण्याऱ्या मळणी यंत्रांकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. मळणी यंत्रातून निघणारा धान आता शेतकरी थेट बाजारात विकत आहेत. पूर्वी मळणीसाठी बराच मोठा काळ शेतात राहावे लागत असे. आता ते काम काही तासांतच पूर्ण होत आहे. शेतकरी यंत्र युगाकडे वळाला खरा, परंतु आजही शेतकरी आत्महत्येचे प्रकार मात्र सुरूच आहे. (वार्ताहर)
धान मळणी यंत्रांच्या मागणीत वाढ
By admin | Published: December 10, 2015 2:05 AM