गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केल्याचे दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट याला तेवढी जबाबदार नसून होम क्वारंटाईन असलेल्या रूग्ण जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या कित्येक रूग्णांनी नियम न पाळता मुक्तपणे फिरणे सुरूच ठेवल्याने अन्य नागरिकांना बाधित केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता अशांवर कारवाई करण्याची गरज असल्याचेही सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.
सामान्य लक्षण असलेल्या बाधितांना होम क्वारंटाईन केले जात असून बाधितांच्या एकूण संख्येपैकी सुमारे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त रूग्ण होम क्वारंटाईन आहेत. मात्र होम क्वारंटाईन असताना त्याचे काही नियम असून तसे पाळणे गरजेचे आहे. जेणेकरून त्य बाधितांपासून अन्य व्यक्तींना धोका होऊ नये. मात्र होम क्वारंटाईन असलेल्या कित्येक बाधितांनी आम्हाला काहीच त्रास जाणवत नसल्याचे बघून आपली दिनचर्या कायम ठेवली. परिणामी त्यांच्यापासून अन्य व्यक्ती बाधित झाले व एकदम भडका उडाला होता. विशेष म्हणजे, आता बाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहेत. मात्र वेगवेगळ्या भागांमध्ये असलेल्या मोजक्या रूग्णांसाठी कंटेन्मेंट झोन तयार करणे शक्य नाही. नेमका याचाच फायदा घेत अशा बाधितांनी कोरोनाला आणखीच पसरविल्याच्या तक्रारी आता येत आहे. यावर आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
------------------------------
नियम तोडल्यास कठोर कारवाई
तरूणांमध्ये कोरोनाचे काही लक्षण नसताना ही ते बाधित होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र त्यानंतरही हे तरूण घराबाहेर फिरताना दिसून आले. त्यांच्या संपर्कात येणारे अन्य नागरिक त्यांच्यापासून बाधित झाले असावे यात शंका नाही. आताही कोरोना रूग्ण निघत असून वाढत्या आकडेवारीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने घराबाहेर फिरत असलेल्या बाधितांची तक्रार आल्यास थेट कठोर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.