आमगाव : नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावातील पाणी पुरवठा योजना कालबाह्य ठरली असून, वाढीव पाणी पुरवठा योजना नियोजन शून्य असल्यामुळे आजही अनेक लोकवस्ती, नगरे तहानलेली आहेत.
आमगाव नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावातील पाणी पुरवठा योजना नियोजितपणे प्रस्तावित होत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. आठ गावातील पस्तीस हजार लोकसंख्येच्या प्रमाणात तेरा लाख पस्तीस हजार पाणीसाठा व पुरवठा उपलब्धता आहे. पाणी साठवण क्षमता असलेल्या पाण्याच्या एकूण नऊ टाक्या आहेत. यात बिरसी या गावात पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी टाकीच उभारण्यात आली नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी कुंभारटोली या गावातून पाण्याची पूर्तता करण्यात येत आहे. नगर परिषद परिक्षेत्रातील गाव पातळीवर नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी मागणीपेक्षा पाणी साठवण क्षमता व पुरवठा कमी होत आहे. आमगाव येथील परिक्षेत्रातील प्रभागात पाणी पुरवठा करण्यासाठी दोन लाख पन्नास हजार लीटर क्षमता असलेली जलकुंभ आहे. परंतु मागणीपेक्षा कमी पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. विविध प्रभागातील मोहनटोला, बेदाडी, पाॅवर हाऊस, समोदेमो, इश्वर धाम, महाजन नगर या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी जल वाहिनी टाकण्यात आली नाही. अपुरा पाणीसाठा असल्यामुळे पुरवठ्याचा प्रश्न आहे. यामुळे पाण्याअभावी या भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. नगर परिषदेकडे पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन नसल्यामुळे नागरिक तहानलेले दिसून येत आहेत.
......
पाण्याच्या टाकीची आवश्यकता
किडगींपार येथील प्रभागातील बोथली मार्ग, जावई टोली, जुनी वस्तीत जलवाहिनी टाकण्यात आली नाही. त्यामुळे येथील नागरिक पाण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत. कुंभारटोली प्रभागातील इंदिरा आवास, राजयोग कॉलनी, ग्रामीण रुग्णालय परिसर, महादेव पहाडी, बिरसी मार्ग परिसरात जलवाहिनीअभावी व कमी क्षमता असलेल्या पाणीसाठ्यामुळे या भागात पाणीपुरवठा करण्यात येत नाही. रिसामा येथील प्रभागात पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या दोन टाक्या आहेत. यातील एक टाकी जीर्ण अवस्थेत आहे. रेणुका नगर, साव नगर, संकल्प, प्रगती नगर, सिव्हील लाईन, रेल्वे स्टेशन परिसरात जलवाहिनीसह नवीन पाणीसाठा जलकुंभाची आवश्यकता आहे.
.....
जलवाहिनीचे नियोजन आवश्यक
बनगाव येथील प्रभागातील यशवंतनगर, इंद्रप्रस्थ, नितीननगर, द्वारकाधाम, किडंगीपार मार्ग येथील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी क्षमता असलेले जलकुंभ नसल्यामुळे पुरवठाच होत नाही. जलवाहिनी टाकण्यासाठी नियोजन प्रस्ताव मंजूर केला जात नाही. माली प्रभागातील सावनटोली, गारपगारी टोली या लोकवस्तीत पाणी पुरवठ्यासाठी नवीन पाणी टाकी व जलवाहिनीची मागणी केली आहे. येथील एक पाणी टाकी जीर्ण अवस्थेत पदमपूर प्रभागातील पोवारीटोला, भवभूती नगर येथे जलवाहिनीची आवश्यकता आहे.