मार्गक्रमणाला अडचण : सार्वजनिक बांधकाम विभाग निष्क्रिय आमगाव : आमगाव शहरातील मुख्य राज्य मार्गावर व्यावसायिकांनी केलेले अधिकचे अतिक्रमण वाहनधारक व पायदळ मार्गक्रमण करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा वाजवत आहे. व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणाकडे वाहतूक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील प्रमुख केंद्र आमगाव असून शहरातील विविध उद्योग, व्यवसाय, शिक्षणकार्य, प्रशासनातील विविध महत्वामुळे संपूर्ण विभागाची कार्यालये नागरिकांसाठी नेहमीच वर्दळीचे ठरले आहेत. आमगाव शहर कामठा, सालेकसा, देवरी व गोंदिया या राज्यमार्गाने जोडला आहे. याच राज्यमार्गाचे सीमाक्षेत्र छत्तीसगड-मध्य प्रदेश राज्यमार्ग वाहतुकीचे असल्याने शहरातील मध्यभागातून वाहनांची वर्दळ नित्याचीच बाब ठरली आहे. वाढत्या वाहनांच्या गर्दीला पुरक रस्ते उपलब्ध आहेत. तर पायदळ मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध आहे. परंतु शहरातील राज्य मार्गावर व्यावसायिकांनी, फुटकर विक्रेत्यांनी अतिक्रमण वाढवले आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे राज्यमार्गावरील वाहतूक निरंतर धोक्याची ठरली आहे. अतिक्रमणे रस्त्यावर आल्याने पादचारी रस्ते व राज्यमार्ग ये-जासाठी अडचणीचे ठरले आहेत. शहरातील कामठा चौक, गांधी चौक, मानकर गुरूजी चौक, आंबेडकर चौक, पंचायत समिती मार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्ग, नटराज मार्ग व गोंदिया-देवरी राज्यमार्ग यावर अतिक्रमणाच्या वाढीने व वाहनांच्या वर्दळीने वाहतूक खंडित होत चालली आहे. नागरिकांना पायदळ चालण्यासाठी असलेल्या फुटपाथ मार्गावर अतिकमण झाल्याने वाहनांच्या वर्दळीतून मार्ग काढत चालण्यासाठी भाग पडावे लागते. शहरातील वाढत्या अतिक्रमणाला पायबंध घालण्यासाठी प्रशासनाने योग्य दखल घेणे गरजेचे आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील महसूल विभाग या बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळ्य व्यावसायिक व फुटकर दुकानदार अतिक्रमण करावयास मोकळे ठरले आहेत. राज्यमार्गावरून धावणाऱ्या वाहनांना वाहतुकीची अडचण निर्माण होवू नये यासाठी वाहतूक पोलीस विभागाने दखल घेणे गरजेचे आहे. परंतु विभागाची अकार्यक्षमता वाहतूक नियमांचा बोजवारा उडवित आहे. राज्यमार्गावर अतिक्रमण व वाहनांची कोंडी पादचारी नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजवित आहे. परंतु संबंधित प्रशासन या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत नसल्याने वाढत्या अपघातांना वाव मिळत आहे.(शहर प्रतिनिधी)
वाढते अतिक्रमण धोकादायक
By admin | Published: January 11, 2017 2:00 AM