गोंदिया : घाण व दुर्गंधीमुळे शहर गटारात गेल्याचे वाटत असतानाच मात्र यामध्ये भाजीपाला व्यवसायीक अधिकचा हातभार लावत आहेत. पालिकेने चुप्पी साधल्याचा फायदा भाजीपाला व्यवसायीक लाटत असून शहरात सर्रास भाजीपाल्यांच्या पोती फेकण्याचे सत्र सुरूच आहे. एकीकडे यामुळे नाल्या बंद पडत आहेत तर दुसरीकडे मात्र भाज्यांच्या या पोतींमधून घाण व दुर्गंध पसरत आहे. शहरवासीयांना याचा त्रास होत असताना पालिका प्रशासन मात्र आपल्या धुंदीत मस्त आहे. शहरातील सफाईला जणू बे्रक लागलेला आहे. यामुळेच बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार व तुंबलेल्या नाल्या दिसून येतात. पालिकेच्या सुस्त कारभारामुळे शहरवासीयांना आता या वातावरणाची सवयच पडली आहे. या घाण वातावरणामुळे मात्र आता शहरात दुर्गंध पसरत आहे. यामुळे शहरात श्वास घेणे दुभर झाले आहे. यातही कचरापेट्या ठेवण्यात आलेल्या परिसरातून उघड्या नाकाने निघणे अशक्य होत आहे. शहराला पडलेल्या घाणीच्या विळख्यातच गणेशोत्सव निघून गेला व अन्य सणांमध्येही हीच स्थिती राहणार यात शंका नाही. दरवर्षीचाच हा प्रकार व एक परंपराच झाल्यासारखे वाटते. अगोदरच घाणीत पडलेल्या या शहरात घाणीत भर घालण्यास येथील भाजीपाल व्यवसायीक हातभार लावत असल्याचेही आता दिसून येत आहे. त्याते कारण असे की, भाजीपाला व्यवसायीकांकडे पडून असलेल्या टाकाऊ भाज्या व त्यांचा पालापाचोळा पोत्यांत भरून शहरात सर्वत्र फेकला जात आहे. या व्यवसायीकांचा मोर्चा आता अंडरग्राऊंड मार्गाकडे वळल्याचेही दिसून येत आहे. या मार्गावर नाल्यांत तसेच रस्त्यावर सर्रास भाज्यांच्या पोती फेकल्या जात आहेत. नाल्यांमध्ये टाकण्यात आलेल्या पोतींमुळे एकतर नाल्या चोक होत आहेत. तर रस्त्यांवर पडून असलेल्या पोतींमधील भाज्या कुजून त्यातून दुर्गंध पसरू लागतो. अगोदरच शहरातील नाल्या चोक असल्याने त्यातून पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. त्यात आता भाज्यांच्या पोती भर घालत आहे. फक्त अंडरग्राऊंड मार्गावरच पोती फेकल्या जात आहेत असे नाही. तर शहरात अन्यत्रही हाच प्रकार सर्रास सुरू आहे. एकतर कचऱ्यात भर त्यात नाल्या चोक होत असल्याचा या भाजीपाला व्यवसायीकांकडून होत आहे. हा सर्व प्रकार उघड्या डोळ््याने दिसत असतानाही पालिका प्रशासन मात्र गुपचाप बसून असल्याचे वाटते. पालिकेने नाक, कान, डोळे व तोंड बंद करून ठेवल्याचा फायदा भाजीपाला व्यवसायी घेत आहेत. तर पालिकेच्या या मूक भूमिकेमुळेच दिवसेंदिवस भाजीपाला व्यवसायीकांचा उदे्रक वाढतच चालला आहे. आज सत्तेत बसलेले विरोधात असताना त्या सत्ताधारींवर टिका करण्याची संधी सोडत नव्हते. आज मात्र त्यांनीच आपल्या कार्यप्रणालीबाबत मंथन करण्याची गरज निर्माण झाल्याचे शहरवासी नवीन सत्तेच्या काही काळातील कारभाराला बघूनच बोलू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)
भाजीपाला व्यावसायिकांचा उद्रेक वाढताच
By admin | Published: September 15, 2014 12:12 AM