सडक अर्जुनी : तालुक्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेवून १५ जूनपासून बेमुदत संप सुरु केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर याचा परिणाम झाला आहे.
आशा सेविकांना कोरोना काळातील मानधन कपात न करता पूर्ण मानधन देण्यात यावे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रतिदिन १५० रुपये भत्ता देण्यात यावा. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरतीचे वेळी आशा सेविका व गट प्रवर्तक यांना एएनएम व जीएनएनएमचा कोर्स पूर्ण केलेला आहे, त्यांना सरळ पदोन्नती देऊन शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे. आशाना एकत्रित वेतन १८०० हजार रुपये देण्यात यावा. गट प्रवर्तक यांना ११ महिन्याचा ऑर्डर देणे बंद करून त्यांना नियमित करण्यात यावे. गट प्रवर्तक काम आवश्यक व नियमित असल्यामुळे त्यांना शासकीय व कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. तोपर्यंत एकत्रित वेतन गट प्रवर्तक यांना २५ हजार रुपये देण्यात यावा. गट प्रवर्तक यांना एक आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे ऑनलाईन डाटा एन्ट्रीसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात यावा. गट प्रवर्तक यांना कोविड १९ चा कामाचा मोबदला प्रति दिवस ५०० रुपये भत्ता देण्यात यावा. आदी मागण्यांना आशा सेविकांना बेमुदत संप सुरु केला असल्याचे पूनम पटले, वर्षा पंचभाई यांनी सांगितले.