परसवाडा : तिरोडा तालुक्यातील इंदोरा /बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आरोग्य सेवा कोलमोडली असून कर्मचारी आपला मनमर्जी कारभार चालवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे मात्र रूग्णांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बल्ब नसल्याने रूग्णांना अंधारातच वावरावे लागत असल्याचे चित्रही बघावयास मिळाले. विशेष म्हणजे मंगळवारी प्रतिनिधीने जाऊन बघितले असता कर्मचारीही दिसले नाही. सायंकाळ पर्यंत एकही कर्मचारी भटकला नाही. सकाळी फक्त १ कर्मचारी महिला होती व पाच वाजता तिही निघून गेली होती. यावर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर तर दिसतच नाही उलट कर्मचारीही नाही असभ्य वागणूक करीत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे डुलीचंद तुंबा (रा. चांदोरी) नामक व्यक्तीच्या पत्नीची प्रसुती केंद्रात झाली होती. दोन दिवस झाले पण डॉक्टरांन फिरकून तर पाहिलेच नसल्याचे त्यांनी सागीतले. तसेच बल्ब नसल्याने रूग्णांना अंधारातच रहावे लागत असल्याचेही त्यांनी सांगीतले. प्रतिनिधी सहा वाजता पोहोचले असता एकही कर्मचारी केंद्रात नव्हता.या प्रकारावबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. आईटवार यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क केला असता गुरुनानक जयंतीची सुटी असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांचे आरोग्य केंद्राकडे लक्ष नसल्याने कर्मचारीही आपला मनमर्जी कारभार चालवित आहेत. शासन आरोग्य सेवे वर कोट्यवधी रूपये खर्च करते. अशात केंद्रातील निधी जातो कुठे येथे हा प्रश्न पडतो. रुग्ण कल्याण समिती देखरेखसाठी असते. पण त्याचेंही लक्ष नसल्याने रूग्णांची मात्र पंचाईत होते. यामुळेच सेवा बरोबर मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत महिलांनी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणे बरोबर नाही असे बोलत कर्मचारी वर्गावर कार्यवाही करण्याची मागणी केली. (वार्ताहर)
इंदोराचे आरोग्य केंद्र वाऱ्यावर
By admin | Published: November 30, 2015 1:44 AM