गोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरत आली आहे. रुग्णसंख्येत दररोज घट होत असून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून, ती आता ६३४वर आली आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने जिल्हावासीयांची थोडी चिंता कायम आहे.
एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचा दर प्रचंड असल्याने मे महिन्यात काय स्थिती राहणार अशी चिंता जिल्हावासीयांना सतावत होती. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचे मीटर डाऊन असल्याने कोरोनाबाधितांची संख्या बरीच कमी झाली, तर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून, दुसरी लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. जिल्ह्यात बुधवारी १२५ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ७६ नवीन रुग्णांची नोंद झाली. पाच कोराेनाबाधितांचा उपचारादरम्यान खासगी व शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,५८,४४८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १,३३,४२८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,५४,०१३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,३३,२०७ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,४५६ कोरोनाबाधित आढळले, त्यापैकी ३९,१४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६३४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ३८४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..................
राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी दर ५ टक्क्यांनी जास्त
कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याच्या रिकव्हरी दरात सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९,१४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा रिकव्हरी दर ९६.७५ टक्के आहे, तर राज्याचा रिकव्हरी दर ९२.७६ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी दर राज्यापेक्षा पाच टक्क्यांनी अधिक आहे.
......
दोन लाख ३३ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ३३ हजार ७९७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व १४० लसीकरण केंद्रावरून लसीकरण केले जात आहे.