लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : यंदा खरीप हंगामातील धानाला परतीचा पाऊस आणि कीड रोगांचा फटका बसल्याने धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. या भागातील शेतकरी एकरी १५ ते १८ क्विंटलपर्यंत धानाचे उत्पादन घेतात, पण धानाच्या उत्पादनात मोठी घट येत असून, एकरी ८ ते ९ क्विंटल धानाचे उत्पादन होत आहे. त्यामुळे यंदा धानाचे उत्पादन ३० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात सध्या हलक्या धानाची कापणी पूर्ण झाली असून, शेतकरी धानाची मळणी करून ते विक्रीसाठी बाजारपेठेत नेण्याची तयारी करीत आहे. अशातच जड धान निघण्यास पुन्हा काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, यंदा ऐन धान भरण्याच्या कालावधीत त्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने त्याचा धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. तो अंदाज आजघडीला काहीसा खरा होताना दिसून येत आहे.
शेतकरी धानाची कापणी करून मळणी करीत असताना चांगल्या दिसणाऱ्या धानाचेही केवळ ४० टक्के उत्पादन होत आहे. या दरम्यान, कीडरोगाचा फटका बसलेल्या धानाचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी कमी होत आहे. काही शेतकऱ्यांच्या मळणीच्या ठिकाणी भेट दिली असता, त्या शेतकऱ्याला एक एकर शेतातून केवळ ९ क्विंटल धानाचे उत्पादन झाले. त्यापुढे एका दुसऱ्या शेतकऱ्याच्या खऱ्यावर भेटा दिली असता, त्या शेतकऱ्याला एका एकरात फक्त चारच क्विंटल धानाचे उत्पादन झाले. यामुळे उत्पादन खर्चही भरून निघणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
काळ्या मऊचा प्रकोपकाही आणखी खऱ्यावर भेट दिली असता, मावा आणि तुडतुड्याचा प्रकोप, तसेच ऐन कापणीपर्यंत धानाच्या लोबांना मऊचे कीटक चिटकलेले दिसून आले. अनेक ठिकाणी काळ्या मऊच्या प्रकोपाने धानही काळे झालेले आहेत. अशात आता अशा काळपट धानाची विक्री करण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना पडत्या भावाने धान विक्री करावी लागत आहे.