गोंदिया : कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया, गोरेगाव, आमगाव या तालुक्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे हळूहळू कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ असली तरी कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी जिल्हावासीयांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा कोरोनाला निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी (दि. २०) १२१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १०२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर १९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात २ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट १.६ टक्के होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४५१८१८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २३१४०३ नमुन्यांची आरटीपीसीआर तर, २२०४१५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१२१८ नमुने कोरोनाबाधित आढळले, तर ४०५०४ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. मागील तीन-चार दिवसांपासून बांधितांच्या संख्येत पुन्हा थोडी वाढ झाल्याने नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे.
................
९ लाख ४२ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. लसीकरणामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यास बरीच मदत झाली. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९४२७८९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
...........
नियमांकडे दुर्लक्ष नकोच
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे समजून नागरिक पुन्हा बिनधास्तपणे वागू लागले आहे. मात्र, बाधितांच्या संख्येत पुन्हा हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.