लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षभरापासून नागरिक कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्यावर वेळीच उपचार घेऊन अनेक नागरिकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. मात्र, आता कोरोनातून बरे झालेल्यांना म्युकॉरमायकॉसिस या बुरशीजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातसुध्दा या आजाराचा शिरकाव झाला असून, दररोज पाच ते सहा रुग्ण सापडत असल्याने नागरिकांनी लक्षणे दिसताच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करण्याची गरज आहे.
म्युकॉरमायकॉसिस हा आजार कोरोनापेक्षाही अतिगंभीर आहे. कोरोना आजारापासून बरे झाल्यानंतर किंवा आजार असताना रुग्णाला या आजाराचा धोका उद्भवू शकतो. या आजारामध्ये विशेषतः रुग्णाला चेहऱ्यावर सूज येणे, चेहऱ्याचा भाग दुखणे, डोकं दुखणे, डोळ्यावर सूज येणे, डोळ्याला दिसणे कमी होणे, तोंडाच्या आतमध्ये सूज येणे, दात दुखणे आदी लक्षणे दिसतात. म्युकॉरमायकॉसिस आजार अतिशय जलदरितीने वाढतो. प्रथम याची सुरुवात नाकातून होते आणि नाकाद्वारे सायनसमध्ये व नंतर डोळ्यात, टाळू व ब्रेनमध्ये सुद्धा तो जाऊ शकतो. या आजाराचा अतिसंसर्ग झाल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. ज्याला आधीपासून मधुमेह आहे किंवा रोगप्रतिकार क्षमता कमी आहे, त्यांना या आजाराचा अधिक धोका आहे. नाकातून पाणी येणे, नाक बंद होणे, डोके दुखत आहे, चेहऱ्यावर सूज येत आहे किंवा डोळ्यासंबंधित अथवा टाळूसंबंधित कुठल्याही वेदना होत आहेत, आदी लक्षणे दिसताच कान, नाक, घसा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार घ्यावे. याकडे थोडेही दुर्लक्ष केल्यास ते आपल्या जीवावरसुध्दा बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आजारामध्ये त्वरित सायनसचे ऑपरेशन करावे लागते. लवकर उपचार न केल्यास टाळूचा भाग किंवा डोळाही काढावा लागू शकतो. याचा संसर्ग मेंदूत झाल्यास जीव जाण्याचासुध्दा धोका होऊ शकतो. या आजाराबाबत फारशी माहिती नसल्याने नागरिक यापासून अनभिज्ञ आहेत. मात्र, या आजाराचे दररोज पाच ते सहा रुग्ण सापडत असल्याने शहरातील कान, नाक, घसा तज्ज्ञांनी याबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
........
आजार नवीन नाही पण धोका वाढला
म्युकॉरमायकॉसिस हा आजार नवीन नाही, पूर्वी जिल्ह्यात वर्षांतून दोन-तीन रुग्ण सापडत होते. मात्र, कोरोनानंतर या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. अनेक शहरांत या आजाराने आता शिरकाव केला आहे. गोंदिया शहरात आता या आजाराचे दररोज पाच ते सहा रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
........
ही आहेत म्युकॉरमायकॉसिसची लक्षणे
- श्वास घेण्यास त्रास, गाल व दात दुखणे
- नाक, टाळूला बुरशीचा काळा चट्टा
- चेहऱ्याच्या हाडाला असह्य वेदना
- डोळा दुखणे, दृष्टी कमी होणे
- जेवताना दात दुखणे किंवा हलणे
.............
वेळीच शस्त्रक्रिया केल्यास होता आजार बरा
म्युकॉरमायकॉसिसचा संसर्ग झाल्यानंतर शस्त्रक्रिया गरजेची असते. त्यासाठी ईएनटी, डोळे, दातांचे शल्य चिकित्सक आणि मेंदूविकार तज्ज्ञ यांची गरज असते. आयसीयू सेटअपमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरे होण्याची शक्यता असते.
........ कोट.....
कोरोनाच्या पहिल्या लाटेत हे रुग्ण नव्हते, मात्र दुसऱ्या लाटेत अचानक म्युकॉरमायकॉसिसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गोंदिया शहरात दररोज चार-पाच रुग्ण मी तपासतो आहे. अनेकांना सर्जरीची गरज पडते. पूर्वी वर्षातून एक किंवा दोन रुग्ण आढळत होते. मात्र, आता यात वाढ झाली आहे.
- डॉ. संजय भगत, ईएनटी सर्जन, गोंदिया.
..................
म्युकॉरमायकॉसिस हा आजार नाकातून प्रवेश करुन डोळे आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. कोरोना रुग्ण किंवा मात करणाऱ्या रुग्णांना या आजाराची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. स्टेरॉईडचा अधिक वापर केल्यामुळे याचा धोका अधिक असतो. या आजाराची लक्षणेे दिसताच वेळीच उपचार करावा. मेंदूमध्ये या आजाराचा संसर्ग झाल्यास रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ शकते. शस्त्रक्रिया व औषधोपचार करुन यावर मात करता येते.
- डॉ. कुशल अग्रवाल, न्युरोलाॅजिस्ट
...................
मागील चार-पाच वर्षांत मी या आजाराचा एकही रुग्ण बघितला नव्हता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकॉरमायकॉसिस या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. डोळ्यापर्यंत हे संक्रमण पोहचते, त्यावेळी डोळा वाचविणे अशक्य असते. हा आजार प्राथमिक अवस्थेत असताना उपचार केल्यास यावर मात करता येते.
- डॉ. नीलेश जैन, नेत्र शल्य चिकित्सक, गोंदिया.
........