लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे. अशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सुरुवातीला ४०० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १,०२५ रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे महिनाभराच्या खर्चाचा ताळमेळ जुळविताना चांगलीच दमछाक होत आहे. पाच राज्यातील निवडणुका आटोपताच केंद्र सरकारने गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरापूर्वी ९७० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १,०२५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. वाढत्या महागाईने खर्चाची जुळवाजुळव करताना तारांबळ उडत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाईत सातत्याने वाढ होत असून सर्वसामान्यांना महिन्याचे बजेट सांभाळताना चांगलेच नाकी नऊ येत आहे.
चूल पेटविता येईना, गॅस परवडेना - शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर उपलब्ध करुन दिले. मात्र, गॅस सिलिंडर भरण्यासाठी गोरगरीब लाभार्थ्यांना १,०२५ रुपये आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने गृहिणींना महिन्याचे बजेट सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागते.
सबसिडी नावालच
- गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पण, त्यावर दिल्या जाणाऱ्या सबसिडीलासुध्दा कात्री लावली जात आहे. ९७५ रुपये मोजल्यानंतर ४३ रुपयांची सबसिडी मिळत आहे. २सुरुवातीला गॅस सिलिंडरवर दीडशे रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात होती. मात्र, आता त्यात सातत्याने कपात केली जात आहे. ३वर्षभराच्या कालावधीत गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास ४५० रुपयांची वाढ झाली, तर सबसिडी मात्र ४३ रुपयांवर आली आहे.
केवळ गॅस सिलिंडरसाठी हजार रुपये कसे परवडतील?
वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे बजेट आधीच बिघडले आहे. त्यातच आता गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात असल्याने पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आली आहे. उत्पन्न स्थिर असून, महागाई मात्र सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने किमान गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची गरज आहे.- श्वेता मस्के, गृहिणी
कोरोनामुळे आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे. अशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून, महिन्याचे बजेट सांभाळताना नाकीनऊ येत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.- कविता शिवणकर, गृहिणी