गोंदिया : मागील वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत चालले असल्याने त्याचा परिणाम अन्य साहित्यांवर पडत असून परिणामी महागाईचा भडका उडत आहे. विशेष म्हणजे, किराणा व भाजीपालाही यापासून सुटला नसून त्यांचेही भाव भडकले आहेत. आजघडीला भाजीपाला घेण्यासाठी थैलीत पैसा व खिशात भाजी अशी स्थिती झाल्याचे नागरिकच बोलत आहेत. आजघडीला ८०-१०० दरम्यानच सर्व भाज्यांचे दर झाले आहेत. अशात एक भाजी खरेदी करायची म्हटली तरी विचार करावा लागत आहे. त्यात जास्त संख्या असलेल्या घरांची तर गोष्ट करता येत नाही. बाजारात भाजीपालाचे भाव ऐकूनच अंगाला घाम फुटतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर, किराणाचे दरही वधारल्याने स्वयंपाकघरांना आता महागाईचा तडका बसला आहे. किराणाची यादी तयार करताना आता गृहिणींची पंचाईत होत आहे. त्यात डाळींचे दर वधारल्याने अगोदरच भाजीपाला परवडत नसतानाच आता फोडणीचे वरणही तयार करणे कठीण झाले आहे. परिणामी दोन वेळा काय खावे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. कोरोनामुळे कित्येकांना आपल्या हातचा रोजगार मुकावा लागला आहे. अशात त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा असताना अन्य सर्वसामान्यही काय खावे असा सवाल करीत आहेत.
---------------------------------
आता पुन्हा बैलजोडीची आठवण
काळ बदलत चालला असून प्रत्येकच क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. शेतीही यापासून सुटली नसून आता शेतीतही यंत्रांचा वापर वाढला आहे. झटपट कामे उरकण्याच्या नादात शेतकरी यंत्रांचा वापर करीत असून त्यामुळे राजा-सर्जाची जोडी विसरून गेला आहे; मात्र डिझेलच्या भडक्यामुळे आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालविणे जड जात असून पुन्हा बैलजोडीची आठवण येत आहे.
-------------------------------------
मेथीची भाजी १०० रुपये किलो
कोरोना काळात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पालेभाज्यांचा जेवणात वापर करा असे डॉक्टर्स सांगत आहेत; मात्र बाजारात सध्या मेथीची भाजी १०० रुपये किलो तर पालक भाजी ८० रुपये किलो दराने विकली जात आहे. अशात सर्वसामान्यांनी आपल्या आहारात पालेभाज्यांचा समावेश कसा करावा असा सवाल उठत आहे.
--------------------------
डाळ वधारल्याने वरणावर विरजण
मध्यंतरी तेलाने भडका घेतला असता स्वयंपाकात कमीत कमी तेलाचा वापर करून गृहिणी कुटुंबाच्या जेवणाची सोय करीत होत्या; मात्र भाजीपाला महागल्याने किमान ताटातून भाजीपाला गायब होऊन फोडणीच्या वरणावर भागविता येत होते. आता तुरीची डाळच ९० ते ११० रुपये किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे फोडणीच्या वरणावरही विरजण पडले असून ताटातून भाजीपाला सोबतच आता वरणही गायब होत आहे.
------------------------------
भाजीपाला व किराणाचे बजेट तेवढेच
पूर्वी किराणा भरताना महागाई बघून थोडेथोडे करून कसे तरी चालविले जात होते. मात्र आता भाजीपालाही भडकला असून किराणा व भाजीपाला दोघांचेही बजेट समान झाले आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचे संपूर्ण बजेट कोलमडले असून दोनवेळच्या जेवणात काय करावे हाच प्रश्न पडतो.
- सविता डोये (गृहिणी)
-----------------------------
सर्वसामान्यांचा घासही हिरावतोय
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वच वस्तूंचे दर वधारले आहेत; मात्र भाजीपाला व किराणा सामानावर त्याचा फटका बसत असल्याने सर्वसामान्यांनी काय खावे असा प्रश्न पडत आहे. भाजीपाला एवढा महागला की काय खरेदी करावे हेच समजत नाही. त्यात किराणा महागल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. महागाईने सर्वसामान्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे.
- भारती शनवारे (गृहिणी)
--------------------------------
गोंदियात नागपूर येथून भाजीपाला येतो व आम्ही येथून खरेदी करून विकतो. आता पेट्रोल-डिझेलचे दर वधारल्याने भाजीपालाही महागला आहे. परिणामी आम्हालाही आमचा नफा काढून भाजीपाला विकावा लागतो. महागलेल्या भाजीपाल्यामुळे आता नागरिक मोजकाच भाजीपाला घेत असून यात आमचेही नुकसान होत आहे.
- राजू देशमुख (भाजी विक्रेता)
-----------------------------
पूर्वी ग्राहक किराणाची महिनाभराची संपूर्ण यादीच आणून देत होते. आता मात्र महागाई वाढल्याने ग्राहक मोजकाच व आवश्यक तेवढाच किराणा खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे मागील वर्षीपासून व्यापार थंडावला आहे. त्यात आता आणखी महागाई वाढल्यामुळे व्यापारीही अडचणीतच आहेत.
- संजय अमृते (किराणा व्यापारी)
--------------------------
(वागे- ८०)
भाजीपाल्याचे दर
शेवगा- १००
गवार शेंग- १००
मेथी- १००
पालक - ८०
-------------------------
असे वाढले पेट्रोल-डिढेलचे दर
जानेवारी २०१८ ------------------ ७८.५६-- ६३.१२
जानेवारी २०१९- ------------------७५.२ --६५.४४
जानेवारी २०२०- -------------------८१.७६--- ७१.२१
जानेवारी २०२१---------------------९१.३२--- ८०.२८
फेब्रुवारी २०२१-----------------------९३.८२--८३.००
मार्च २०२१------------------------ ९८.४१---८८.०८
एप्रिल २०२१-----------------------९७.६७--८७.३२
मे २०२१----------------------------९९.५६--८९.६५
जून २०२१-------------------------१०१.६३--९२.१७
जुलै २०२१--------------------------१०६.११-- ९६.१०