कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रशिया - युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे महागाई वाढणार, असे सर्वत्र म्हटले जात होते. मात्र, आता या युद्धाचे पडसाद उमटू लागले आहेत. महागाईने आता आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केली असून, प्रत्येकच वस्तूंचे दर आता वाढताना दिसत आहे. स्वयंपाकासाठी सर्वात महत्त्वाच्या खाद्यतेलांच्या दराचा भडका उडाला असून, याशिवाय अन्य किराणामालही चांगलाच वधारला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार, असे सांगितले जात आहे. मात्र, असे झाल्यास त्यानंतर आणखी महागाई वाढणार, यात शंका नाही. सध्या खाद्यतेलासोबतच गहू, शेंगदाणा, रवा, मैदा, कणिक आदींचे दर वधारले आहे. प्रत्येकच वस्तूंचे दर ५-१० रूपयांची वधारले असून, यामुळे किचनचे महिन्याचा बजेट बिघडले आहे. यामुळे सर्वसामान्यांची अडचण होत असून, काय खावे अशा प्रश्न ते करत आहेत. शासनाने महागाई नियंत्रणात आणावी, ही एकच मागणी जोर धरू लागली आहे.
गहू का महागला? - व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या जगात ३५ टक्के गहू रशियातून पुरवला जातो. आता रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने रशियाकडून गव्हाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गव्हाचे दर वधारले आहेत. शिवाय अशा परिस्थितीत भारतातून गव्हाला मागणी वाढणार व त्यामुळेही गव्हाचे दर वाढले असून, येत्या काळातही अशीच स्थिती राहणार, असे दिसून येत आहे.
सुर्यफूल व पामतेल बंद भारतात सुर्यफूल, सोयाबीन व पामतेल विदेशातून येते. यातील सुर्यफूल व सोयाबीन तेल रशिया व युक्रेन येथून येते. आता रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचा पुरवठा या देशांनी बंद केला आहे. परिणामी तेलांचे दर वधारले आहे. विशेष म्हणजे, या देशांकडे तेल आहे मात्र युद्धामुळे त्यांच्याकडून पुरवठा बंद असल्याने हा सर्व परिणाम जाणवत असल्याचे व्यापारी सांगतात.
किचनचे बजेट कोलमडले
युद्धामुळे महागाई वाढणार, असे सांगितले जात असतानाच आता त्याचे परिणाम दिसत आहे. खाद्यतेलाचे दर वधारलेले असतानाच किराणामालाचे दरही वधारले आहेत. अशात सर्वसामान्यांनी आता काय खावे, असा प्रश्न पडतो. शासनाने महागाई नियंत्रणात आणावी तेव्हाच सर्वसामान्यांना दोन घास मिळतील. - सीमा बैतुले (गृहिणी)
खाद्यतेलांचे दर वधारले असल्याने स्वयंपाक करताना तेलाचा वापर सांभाळूनच करावा लागतो. अशात आता किराणामालाचेही दर वधारल्याने सर्वसामान्यांना दोनवेळचे जेवणही कठीण झाले आहे. गहू, कणिक, रवा, मैदा सर्वच महागले अशात काय खरेदी करावे व काय खावे, असा प्रश्न पडतो. - रेखा इंगळे (गृहिणी)
अशीच स्थिती राहणार...रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा हा परिणाम आहे. मात्र, आता हे दर कमी होतील, असे वाटत नाही. तसेच युद्ध थांबले तरीही त्यानंतर आणखी २-३ महिने अशीच स्थिती राहणार आहे. - बालचंद मुलचंदानी (व्यापारी)