गोरेगाव : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, ग्रामीण भागात लसीकरणाला घेऊन गैरसमज आहे. ते गैरसमज दूर करून लसीकरणाचे महत्त्व पटवून देत त्याबाबत जनजागृती करा, लसीकरणाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवा असे निर्देश खा. सुनील मेंढे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी (दि. १०) कोरोना उपाययोजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला भाजपा जिल्हा महामंत्री रेखलाल टेभंरे, नायब तहसीलदार नरेश वेदी, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनंत चांदेकर, नगर पंचायतच्या मुख्याधिकारी हर्षीला राणे, भाजपा तालुका अध्यक्ष डाॅ. साहेबलाल कटरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. लक्ष्मण भगत, माजी समाजकल्याण सभापती विश्वजित डोंगरे, माजी जि. प. सदस्य खुमेंद्र मेंढे, पोलीस निरीक्षक सचिन मैत्रे, संजय बारेवार, सहायक खंडविकास अधिकारी अरुण गिर्हेपुंजे, विजय पटले, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खा. मेंढे यांनी कोरोना रुग्ण संख्येविषयी माहिती घेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत लसीकरणाची माहिती पोहोचविण्यास सांगितले. तालुक्यात उपलब्ध असलेल्या आरोग्यविषयक सोयी सुविधांचा आढावा घेतला.