देवरी : आरोग्य विभागाच्या २५ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा ऐन वेळेवर रद्द केल्याने परीक्षार्थींचा झालेला हिरमोड, परीक्षा केंद्र दूरदूर भेटलेल्या परीक्षा केंद्रासाठी गेलेल्या परीक्षार्थींचा विनाकारण प्रवास, परीक्षार्थींना त्यांचा झालेला खर्च, परीक्षा शुल्क, प्रवास भाडे परत देण्यात यावे या मागणीसह ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देवरी तालुक्यातील परीक्षार्थींनी केली आहे.
२५ सप्टेंबर व २६ सप्टेंबर रोजी गट क व गट ड च्या ६०० पदासाठी मेगा भरतीच्या परीक्षा आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या होत्या. सदर भरतीप्रक्रियेसाठी मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. या कंपनीकडे भरतीचे काम करण्यासाठी करारपत्र करण्यात आलेले आहे. यामध्ये कंपनीने संकेतस्थळाची स्थापना करणे, ऑनलाइन अर्ज मागवीणे, उमेदवारांना परीक्षा पत्र देणे, शाळा महाविद्यालय अधिग्रहित करून बैठक व्यवस्था करणे, लेखी परीक्षा घेणे व गुणवंत यादी तयार करणे ही जबाबदारी कंपनीची होती. या पदासाठी राज्यभरातून लाखो परीक्षार्थींनी अर्ज सादर केलेले होते. खुल्या प्रवर्गातून परीक्षार्थींकडून ५२० रुपये परीक्षा शुल्क, तर आरक्षित प्रवर्गातून २७० रुपये प्रति अर्ज वसूल करण्यात आले होते. याचाच अर्ज कंपनीने अर्ज भरलेल्या लाखो परीक्षार्थींकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केलेली आहे. कधी नव्हे तो एवढा सावळा गोंधळ या भरतीप्रक्रियेमधून दिसून आला.
......
परीक्षेची पूर्वतयारीच नाही
परीक्षार्थींना दूरचे परीक्षा केंद्र दिलेले असल्याने परीक्षार्थींना आर्थिक व मानसिक व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागले आहे. देवरी तालुक्यातील परीक्षार्थींना गोंदिया जिल्ह्याचे केंद्र न दिले गेले. परीक्षार्थींना एक दोन दिवस अगोदर केंद्रावर पोहोचावे लागले. २५ सप्टेंबर रोजी परीक्षा असतानादेखील अर्थ असा होतो की कंपनीने परीक्षेची कोणतीही तयारी केल्याचे दिसून येत नाही.
......
परीक्षार्थींना भुर्दंड
परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी ऐनवेळी रात्री १० वाजता या परीक्षा आरोग्य विभागाने रद्द केल्या. परीक्षा रद्द झाल्याची बातमी येऊन धडकली. हा शासन आणि कंपनीने गोरगरीब परीक्षार्थींवर केलेला वज्रघात होता. ही परीक्षा होती की जीवघेणी परीक्षा? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही परीक्षा रद्द करणाऱ्यांवर चौकशी करुन कठोर कारवाई करण्याची मागणी देवरी तालुक्यातील परीक्षार्थींना केली आहे.