गोंदिया : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारी सायंकाळी आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ३० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी केली आहे.
जिल्ह्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा रबी हंगामातील कापणी केलेल्या धानाला सर्वाधिक फटका बसला, तर शेतातील उभ्या धानाचे लोंब मोठ्या प्रमाणात झडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. अवकाळी पावसाचे पाणी बांध्यामध्ये साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाखड झालेल्या धानाची विक्री करायची कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाला त्याचा अहवाल पाठविण्यात यावा, तसेच हेक्टरी ३० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी केली आहे.