लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : जिल्ह्यातील काही भागात १३ फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटींमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या मतदारसंघात येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील गावांचीच पाहणी केली. जेव्हा की पाथरी, सिलेगाव, हिरापूर, बोळूंदा, बागडबंद या तिरोडा विधानसभा मतदारसंघातील गावांतील शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. परंतु त्या भागात पालकमंत्री पोहोचलेच नाही. अखेर आमदार विजय रहागडांले यांनी या गावांसह तिरोडा तालुक्यातील गारपिटग्रस्त गावांमध्ये जाऊन पाहणी करीत तहसीलदारांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देश दिले.पालकमंत्री बडोले यांनी १४ फेब्रुवारीला गोरेगाव तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन अवकाळी पाऊस व गारिपटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प. समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट उपस्थित होते. तर आमदार रहागंडाले यांच्यासोबत तहसीलदार डहाट, समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे,लक्ष्मण भगत, सुरेन्द्र बिसेन, पं.स. सदस्य पुष्पराज जनबंधू यांच्यासह गारपीटग्रस्त गावातील पोलीस पाटील, सरपंच उपस्थित होते.गारपिटीमुळे गोरेगाव तालुक्यातील १५ गावांना जबर फटका बसला आहे. तर ४६९ घरांचे नुकसान झाले आहे. आमगाव तालुक्यातील ५ गावांतील २५५ घरे, देवरी तालुक्यातील ९ गावे, तिरोडा तालुक्यातील १० गावांतील ४६९ घरे, सालेकसा तालुक्यातील ९ गावांना या गारपिटीचा फटका बसला आहे. अर्जुनी मोरगाव व सडक-अर्जुनीला काही प्रमाणात फटका बसला आहे.गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार, मोहाडी, कमरगाव यासह ४० गावांतील शेतीचे नुकसान झाले.
आमदारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:47 PM