गोंदिया : विभागीय आयुक्त अनूप कुमार हे १ आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी केली. यात त्यांनी तालुक्यातील गर्रा येथे बांधण्यात आलेल्या सिमेंट प्लग बंधाऱ्याची पाहणी करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांच्याकडून बंधाऱ्याबाबतची माहिती जाणून घेतली. अदानी फाऊंडेशनकडून खोलीकरण करण्यात आलेल्या बरबसपुरा व बेरडीपार (काचेवानी) येथील माजी मालगुजारी तलावाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. तलाव खोलीकरणामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून तलावाच्या परिसरातील विहिरीतील व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. मत्स्योत्पादन घेण्यासाठी या तलावातील पाण्याचा भविष्यात मासेमार बांधवाना उपयोग होणार असल्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत पाडवी, उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे व के.एन.के. राव, तहसीलदार संजय पवार व चव्हाण, तालुका कृषी अधिकारी वाहने व पोटदुखे तसेच लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
आयुक्तांकडून जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी
By admin | Published: August 03, 2015 1:24 AM