शेतकऱ्यांचे प्रस्ताव : फक्त तिघांनाच अनुदान, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अमरचंद ठवरे अर्जुनी मोरगाव जमिनीच्या सातबारावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यु, अपघातामुळे काही अवयव निकामी झाल्यास अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करण्याच्या हेतुने राज्य शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविल्या जात आहे. मात्र ही योजना तारक की मारक असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी अपघातग्रस्त १७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आले. त्यामधून तिघांनाच अनुदान प्राप्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत असलेली महत्वाकांक्षी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी तारक की मारक? असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या पश्चात वारसानाला दोन लाखाची नुकसान भरपाई देण्याची तरतूद गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतंर्गत करण्यात आली आहे. नॅशनल इन्सुरेन्स कंपनी लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) दावा मंजूर झाल्यास दाव्याची रक्कम लाभधारकांच्या बँक खात्यात जमा करते. दावा नामंजूर झाल्यास विमा कंपनी लाभधारक आणि तालुका कृषी अधिकारी यांना स्वतंत्रपणे पत्रव्यवहाराने कळविते, असे त्या प्रस्ताव प्रकरणात नमूद केले आहे. ज्या शेतकऱ्यांचा सात-बारा नोंदीमध्ये नावाचा उल्लेख आहे, अशा शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई म्हणून दोन लाख, अपघातामुळे एक डोळा निकामी झाल्यास एक लाख, अपघातामुळे एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव आवश्यक त्या कागजपत्रांची पूर्तता करून संबंधितांकडे पाठविण्यात आले. ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले, त्यात खामखुरा येथील विलास महादेव मिसार याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. फेब्रुवारी २०१६ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आले. बाराभाटी रस्ता अपघातातील ललराम मंगरू पंधरे मार्च २०१६, इटखेडा रस्ता अपघातातील सदाशिव दोडकू बुराडे (मार्च २०१६), अर्जुनी-मोरगाव येथील मुकुंदा शंभुजी शहारे याचा रस्ता अपघात मृत्यु (मे २०१६), चापटी येथील व्यंकट आदे (जून १६), अर्जुनी-मोरगाव येथील विठ्ठल कोहरे (जून १६), महागाव येथील विषबाधेने मृत्यू झालेले रमेश पिल्लेवान, सिरेगावचे रस्ता अपघाताने मृत झालेले श्रावण संग्रामे (जुलै १६), झाशीनगरचे मनोहर डोमळे (जुलै १६), परसोडी रैयत येथील ईश्वरदास मांदाळे (जुलै १६), अर्जुनी-मोरगावचे रत्नदीप उके (जुलै १६), मुंगली येथे वीज पडून मृत्युमुखी झालेल्या मंजुळा बाबुराव राऊत (आॅगस्ट १६), बोरटोला येथील साप चावून मृत्युमुखी झालेले विलास मेंढे (सप्टेंबर १६), गुरांचा गोठा पडून मृत्युमुखी झालेले झरपडा येथील शंकर मस्के (सप्टेंबर १६), मांडोखालचे ताराचंद शहारे (सप्टेंबर १६), झरपडा येथील विषबाधेने मृत्युमुखी झालेले शंकर रामा मस्के (डिसेंबर १६), नवेगावबांध येथील रेल्वेत मृत्युमुखी पडलेले घनशाम कापगते अशा १७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अनुदान मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह पाठविण्यात आले होते. कुटुंबातील कमावता माणूस मृत्युमुखी पडल्यानंतर कुटूंबाची कशी वाताहात होते, हे त्या कुटूंबालाच कळते. वेळीच योजनेचा अनुदान मिळाला तर परिस्थिती सावरण्यास मदत होते. योजना जरी लोकहिताच्या असल्या तरी त्यांची फलश्रृती योजनेच्या अंमलबजावणीवर असते.
विमा योजना तारक की मारक?
By admin | Published: March 01, 2017 12:36 AM