लोकमत न्यूज नेटवर्क केशोरी : या आदिवासी जंगल व्याप्त भागात सध्या तेंदूपत्ता संकलन करण्याचा हंगाम जोरात सुरू आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी पहाटेपासून मजूर वर्ग जंगलात जात आहे. परंतु जंगलातील हिंस्र पशुंच्या भीतीने लहान बालमजूर वगळता मोठी माणसे तेंदूपत्ता संकलन करण्याचे कार्य करताना दिसत आहेत. या मजुरांना विमा देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. तेंदूपत्ता संकलन करण्याकरिता जाणाऱ्या मजुरांना जंगलातील हिंस्त्र पशुंचा हल्ला झाल्यास काहींना जीवसुद्धा गमवावा लागतो. अशावेळी शासनाकडून अल्प प्रमाणात मोबदला मिळतो. त्या मजुरांचे कुटुंब उघड्यावर पडते. तेव्हा तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना शासनाने विमा लागू करावा, अशी मजुरांची मागणी आहे. वर्षातून उन्हाळ्याच्या दिवसांत जवळपास एक महिना तेंदूपत्ता संकलनाचा व्यवसाय आदिवासी भागात चालत असतो. तेंदूपत्ता संकलनाच्या व्यवसायामधून शासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होत असतो. ज्या मजुरांच्या भरवशावर शासनाला कोट्यवधी रुपये महसूल मिळतो, त्या मजुरांचा जीव गेला तर त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. रखरखत्या उन्हात जीवाची पर्वा न करता उन्हाचे चटके सहन करीत एक एक पत्ता तोडून घरी आणतात व पानाचा पुडा बांधून फळीवर पोहोचती केली जातात. तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांचा हिंस्त्र पशुच्या हल्यात जीव गमवावा लागल्यास शासनाच्या वतीने सहानुभूतीच्या नावाखाली अल्प मोबदला देण्यात येते. या मोबदल्यात कुटुंबातील इतर सदस्यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नसते. त्यामुळे त्यांना वनवन भटकावे लागते. तेव्हा शासनाने तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना विमा लागू करावा, अशी मजुरांची मागणी आहे.
तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना विमा द्या
By admin | Published: May 31, 2017 1:20 AM