गोंदिया: शिक्षकांचे वेतन ५ तारखेच्या आत मिळण्याची कायम स्वरूपात व्यवस्था करण्यात यावी, यात कधी शाईची प्रत तर कधी बजेटमुळे वेतन लांबते. त्यामुळे बँकाकडील असलेल्या कर्जावर व्याजाचा भुर्दंड ४ हजार शिक्षकांवर सहन करावा लागतो. म्हणून सीएमपी प्रणाली लागू करण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यात याव्या, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने १३ सप्टेंबर, २०२१ला जिल्हा परिषद गोंदियासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डी.टी.कावळे यांनी दिली.
मागील दीड दोन वर्षांत संघटनेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली आहे. आश्वासित करण्यात आले, परंतु प्रत्यक्षात मागण्या सोडविण्यात आल्या नाहीत. कोरोना कालावधीत संघटनेने सावध भूमिका घेऊन कोविड १९च्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे कामे केलीत. या कालावधीत कर्तव्यावर असताना २०-२५ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. कोविड १९च्या आजारानेही काही शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक महिन्यात वेतन २०-२५ दिवस उशिराने होत असल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांच्या न्याय योग्य मागण्या निकालात काढाव्यात, यासाठी १३ सप्टेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यातून मागण्या निकालात निघाल्या नाही, तर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या तालुका व जिल्हा कार्यकारिणीने घेतल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष डी.टी. कावळे यांनी प्रसिद्धी माध्यमातून दिली आहे. आंदोलनात शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आनंद पुंजे, टी.के.नंदेश्वर, जितेंद्र डहाटे, नानन बिसेन, रेणुका जोशी, डी.टी.कावळे, एस.यू.वंजारी, के.एस.रहांगडाले, ए.डी.धारगांवे, अरुण शिवणकर, एम.बी.रतनपूरे, अजय चौरे, कृष्णा कापसे, किशोर पटले, अनिल वट्टी, प्रकाश कुंभारे यांनी कळविले आहे.