गोंदिया : देवरी येथील महावीर राइस मिल व नवाटोलाच्या पंचमवार यांच्या घरून रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या एका सदस्याला अटक करण्यात आली. ही कारवाई २८ मार्च रोजी पहाटे १.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेने केली. प्रदीप ऊर्फ दादू देवधर ठाकूर (३०), रा. देवघर मोहल्ला, खपराभाट, बालोद छत्तीसगड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२६ मार्चच्या पहाटे ५ वाजता देवरीच्या महावीर राइस मिलच्या दाराचे कुलूप तोडून ३ अनोळखी चोरट्यांनी मिलमधील ४ लाख ३८ हजार रुपये रोख पळविला होता. त्याच दिवशी नवाटोला येथील कृष्णा चंद्रया पंचमवार (६०) यांच्या घराचे कुलूप तोडून त्याच ३ अनोळखी चोरट्यांनी एक तोळे सोन्याची साखळी व रोख रक्कम असा एकूण ६२ हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. तसेच कोहमारा येथील सहकारी सोसायटीचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न केला होता. या तिन्ही गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी घेतली. गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत्या चोरीचे प्रमाण पाहता पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी दोन वेगवेगळे पथक तयार करून आरोपी रवाना केले होते.
यातील आरोपी प्रदीप ऊर्फ दादू देवधर ठाकूर (३०) याने आरोपी नरेश महिलांगे, रणजित यांच्या मदतीने चोरी केली होती. यातील तीन सदस्यांपैकी एका सदस्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक जीवन पाटील, पोलिस हवालदार तुलसीदास लुटे, राजू मिश्रा, इंद्रजित बिसेन, महेश मेहर, चेतन पटले, प्रभाकर पालांदूरकर, दीक्षित दमाहे, संजय मारवाडे, विनोद बरय्या, मोहन शेंडे, धनंजय शेंडे, हंसराज भांडारकर, अजय रहांगडाले, मुरली पांडे, विनोद गौतम, महिला पोलिस शिपाई कुमुद येरणे यांनी केली.
७० ठिकाणचे तपासले सीसीटीव्ही फुटेज
स्थानिक गुन्हे शाखेचे दोन्ही पथक हे देवरी येथील दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना घटनास्थळ ते डोंगरगडपर्यंतच्या ६० ते ७० ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. तांत्रिक विश्लेषणावरून अज्ञात आरोपींचा शोध घेतला.
गुन्ह्यासाठी वापरलेली कार केली जप्तआरोपी प्रदीप ऊर्फ दादू देवधर ठाकूर हा डोंगरगड, (छत्तीसगड) परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्याने त्यास पथकाने २८ मार्च रोजी १:३० वाजता गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. आरोपी प्रदीपकडून ४७ हजार रुपये रोख रक्कम व कार सीजी ०५ यू ४३७३ किंमत ३ लाख रुपये असा एकूण किंमत ३ लाख ४७ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपींवर तीन जिल्ह्यांत गुन्हे दाखल
आंतरराज्यीय घरफोडीचे आरोपी प्रदीप ऊर्फ दादू देवधर ठाकूर (३०), नरेश महिलांगे व रणजित या तिघांवर नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडून गोंदिया जिल्ह्यातील इतर गुन्हेसुद्धा उघडकीस येण्याची शक्यता आहे.