लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सहायक वन व्यवस्थापन समिती नवाटोला (हाजराफॉल) व वनविभाग सालेकसा यांच्या संयुक्त गस्तीच्या वेळी मध्य प्रदेशातील सागवान तस्करांच्या टोळीला शासकीय वनातून अवैध वृक्षतोड करताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाचे कर्मचारी व स.व.व्य. समिती नवाटोलाच्या सदस्यांनी हाजराफॉल परिसरात रात्रीची गस्त लावली होती. या परिसरात सागवान चोरी करणारी टोळी असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्या अनुषंगाने सालेकसाचे वनपरिक्षेत्राधिकारी ए.व्ही. इलमकर, स.व.व्य. समिती नवाटोलाचे अध्यक्ष गोविंद मरस्कोल्हे व सालेकसाचे क्षेत्र साहाय्यक एम.एम. गजभिये यांची विशेष चमू तयार केली. ही चमू नवाटोला परिसरात रात्री गस्तीवर असताना त्यांना दरेकसा घाटाजवळ कक्ष क्रमांक ८१८ अवर्गीकृत वनामध्ये हात आऱ्याचा आवाज आला. या आवाजाच्या दिशेने गेल्यावर त्यांना आरोपी जगन प्रताप वसोने, जोहन प्रताप वसोने, पुनाराम तेजलाल लिल्हारे यांच्यामध्ये चकमक झाली. तर नीलेश उपराडे, प्रमोद (सर्व रा. टेकेपार, ता. लांजी, जि. बालाघाट) (मध्य प्रदेश रहिवासी) हात आऱ्याच्या साहाय्याने सागवान लाकूड कापताना आढळले. या तस्करांच्या टोळीशी वनकर्मचारी व समिती सदस्य यांची चकमक झाली. या चकमकीमध्ये आरोपी क्र. १ ते ३ यांना रंगेहाथ पकडण्यात यश आले व आरोपी क्र. ४ व ५ फरार झाले. आरोपींच्या नावे वन गुन्हा ०४१९१/१०४७३१/२०२१ जारी करण्यात आला. आरोपींकडून हातआरा, कुऱ्हाड, रस्सी व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून ४७१९१ रुपयांचे सागवान जप्त करण्यात आले.
मध्य प्रदेश वन विभागदेखील होता या टोळीच्या शोधात - २१ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना प्रथम दंडाधिकारी न्यायालय, आमगाव यांच्या समक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपींना दोन दिवस वन कोठडीमध्ये पुढील तपासाकरिता ठेवले आहे. ही टोळी मध्य प्रदेशातदेखील सक्रिय असून त्यांच्याविरुद्ध म.प्र. वनविभागात वन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तेदेखील या टोळीच्या शोधात होते. हाजराफॉल पर्यटनस्थळी कार्यरत असलेल्या नवाटोला संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी आरोपींना पकडण्यात वन विभागाला सहकार्य केले.