गोंदिया : राज्यभरातील भरती प्रक्रिया बंद असताना गोंदिया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी असे पत्र शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांनी अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) यांना १९ मार्च रोजी दिलेल्या पत्रातून म्हटले आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन खासगी अनुदानित शाळातील रिक्त जागा भरण्यास मान्यता दिली. शिक्षकांना मान्यता देऊन त्यांचे वेतन सुरू केले. या संदर्भात मनोज नेर्लेकर पोलीस उपअधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र यांच्याकडे १ जानेवारी २०२१ रोजी तक्रार करण्यात आली होती. सालेकसा तालुक्याच्या कावराबांध येथील सुरेश डोमनसिंग मच्छीरके यांनी तक्रार केली होती. तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी एस.जी.मांढरे यांनी दिलेल्या सर्व वैयक्तिक मान्यतेबाबतच्या आदेशाची छायांकित प्रत शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे पदनामासह नागपूर उपसंचालक कार्यालयात पाठविण्यास सांगितले आहे. सन २०१७-१८ ते सन २०१९-२० या तीन वर्षाच्या काळात मांढरे यांनी दिलेल्या सर्व नियुक्त्यांची माहिती देण्यात यावी,असे पत्रात म्हटले आहे.