केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी सह वनक्षेत्रात कार्यरत असलेले वनरक्षक हे आपल्या मर्जीतील ट्रॅक्टर मालकांना अवैधरीत्या रेती चोरुन नेण्यात मुभा देऊन मदत करीत असून शासनाने मंजूर केलेल्या घरकूल बांधकामासाठी बैलगाडीद्वारे रेती नेणाऱ्या नागरिकांवर विनाकारण त्रास देत कारवाई करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शिवसेना तालुका संघटक मंत्री चेतन दहीकार यांनी वनपरिक्षेत्राधिकारी गोठणगाव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
केशोरी परिसरातील नदी पात्रातून अवैधरीत्या रेती चोरुन नेणाऱ्या मर्जीतील ट्रॅक्टर मालकांना वनरक्षक मुभा देऊन अभय देत असून घरकूल बांधकामासाठी बैलगाडीद्वारे रेती वाहून नेणाऱ्या लोकांवर कारवाई करुन त्रास देत आहेत. तसेच सरपणासाठी डोक्यावरुन काड्या नेणाऱ्या महिलांशी असभ्य वर्तन करुन त्रास देत असल्याचा आरोप आहे. या विरोधात शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने तालुका संघटक मंत्री चेतन दहीकार यांनी नागरिकांना विनाकारण त्रास देणाऱ्या वनरक्षकाची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी वनपरिक्षेत्राधिकारी गोठणगाव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चेतन दहीकर यांनी दिला आहे.