अहवाल गेला नाही : अपहार थांबविण्यासाठी कार्यकारिणीची गरजगोंदिया : राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गावांना लोकसंख्येच्या आधारावर लाखो रुपयांची बक्षीसे वाटली. या बक्षिसांच्या रक्कमेचे नियोजन कसे करावे, यासाठी शासनाने नियोजन पत्रकेही काढली. मात्र ग्राम पंचायतीमार्फत पुरस्कार रकमेचा अपहार केल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाल्या. हा प्रकार राज्यातच आहे. या पुरस्काराचा अपहार थांबविण्यासाठी तालुकास्तरावर विनियोग व आॅडिी करणारी समिती नेमणे गरजेचे झाले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरु झाली. या मोहिमेत पहिल्या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ५६ गावे, दुसऱ्या २६२ गावे, तिसऱ्या वर्षी २०५ गावे व चौथ्या वर्षी उर्वरित अशा एकूण ५५६ गावांना शासनाने कोट्यवधींची बक्षिसे वाटली. परंतू या पुरस्कार रकमेचा विनियोग काही ग्राम पंचायतींनी योग्यरीत्या न केल्यामुळे समित्यांच्या तक्रारी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या. बिरसी, हिवरा, पांजरा व आमगाव तालुक्यातील भजेपार या गावांच्या तक्रारी बऱ्याच गाजल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे पुरस्कार प्राप्त गावांकडून विनियोग केल्याचा अहवाल मागविण्यात आला होता. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी पुरस्कार रकमेच्या विनियोगाचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिलेला नाही.यामुळे पुरस्कार रकमेत मोठा घोळ झाला असावा, अशी दाट शक्यता आहे. यासाठी तालुकास्तरावर एक समिती गठित केल्यास ही समिती पुरस्कार रकमेचे नियोजन योग्य झाले की नाही, त्याची पाहणी करेल. या समितीत पोलीस विभागाचा एक व्यक्ती, महसूल विभागाचा एक व्यक्ती, खंडविकास अधिकारी, सरपंच प्रतिनिधी, पोलीस पाटील प्रतिनिधी व पत्रकार प्रतिनिधीचा समावेश करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व गावे तंटामुक्त झाली. परंतु पहिल्या तीन वर्षात प्राप्त झालेल्या ५५६ गावांना पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार रकमेचे नियोजन योग्य झाले की नाही हे पाहण्याची सर्वस्व जबाबदारी तालुकास्तरावर कार्यकारिणी गठित करुन त्यांना द्यावी, अशी मागणी मोहिम राबविणाऱ्यांंनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
विनियोग समिती नेमा
By admin | Published: February 15, 2016 2:03 AM