खड्ड्यात गेला रस्ता : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निंद्रावस्थेतआमगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयो आमगाव येथील कार्यालयात अधिकारी नाहीत काय? याचे उदाहरण म्हणजे सततच्या पावसाने आमगाव-देवरी मार्गावर पडलेले खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. मात्र अधिकारी किंवा कर्मचारी याची झोप अद्याप उघडली नसून ते निद्रीस्त असल्याचे समजते. अनेक दिवसांपासून आमगाव-देवरी मार्गावर ठिकठिकाणी जवळपास एक ते दोन फुटाच्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्याच खड्ड्यांतून चारचाकी, दुचाकी, सायकलस्वार प्रवास करीत आहेत. अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांत पडले. काहींना दुखापतही झाली. मात्र अधिकारी किंवा कर्मचारी समोर येऊन खड्ड्यात काही तरी गिट्टी टाकून त्यांना बुजविण्याचे धाडस अजूनपर्यंत कोणी केले नाही.पदमपूराच्या समोरील बाम्हणी रेल्वे फाटकाजवळील पुलावर ऐवढे खड्डे पटले आहेत की प्रवाशांना खड्ड्यात पाणी असल्याने अनुमान काढणे कठिण झाले आहे. त्याचा फटका वाहन चालकांना बसतो. दुचाकी सरळ खोल खड्ड्यात जाऊन अनेक प्रवाशी पडले व त्यांना दुखापत झाली. मात्र पडलेल्या खड्ड्यात गिट्टी किंवा मुरुम टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयोकडून झाले नाही. याच मार्गावर अंजोरा समोरील पुलावर चित्र मोठे विचित्र आहे. कोणत्या बाजूने गाडी काढायची, असे गंभीर आव्हान चालकासमोर असते. तोल गेला तर पुलाच्या खाली अपघात नक्की होणार, हे निश्चित आहे. खड्डे वाचविण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनाशी आमोरसमोर टक्कर होऊन अपघात झाल्याशिवाय राहत नाही, पुलावर अशी गंभीर स्थिती आहे. यापेक्षा आमगाव-देवरी मार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे मृत्यूला आलिंगन देत आहेत. तसेच दरवर्षी त्याच ठिकाणी सतत खड्डे पडतात. त्याची उन्हाळ्यात दुरुस्ती होेते. मात्र पावसाळा लागला की त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडतात, हे वेळापत्रक दरवर्षीचे ठरलेले आहे. एकंदरीत दाखविण्याकरिता काम घेतात, मात्र कामाचा दर्जा मुळीच राहत नाही. पोवारीटोला समोरील पुलावर दरवर्षी एकाच ठिकाणी खड्डे पडतात कसे, हा प्रवाशांसमोर मोठा बिकट प्रश्न आहे. कामाच्या नावावर बिल तयार करणे, कंत्राटदाराचे पोट भरणे, त्यात आपले चांगभलं करणे ही अधिकाऱ्यांची नित्याचीच बाब ठरली आहे. मात्र नेहमीकरिता उपाय अधिकाऱ्यांना सूचला नाही व उपाय सूचला असेल तर त्याची कायमस्वरुपी अंमलबजावणी होणार नाही किंवा अधिकारी करणार नाही. फक्त निधी नाही, नियोजन नाही, ही बोलभाषा अधिकाऱ्यांना पाठांतर झाली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयोचे अधिकारी, कर्मचारी व चालकसुद्धा नगरात मुक्कामी नाही. गोंदिया-नागपूर हा वेळापत्रक ठरलेला आहे. जवळपास १२ वाजता येणे, चार तास थांबणे किंवा गोंदिया डिव्हिजनमध्ये गेले आहेत, असे उत्तर ऐकायला मिळते. लगेच चार वाजले की परतीचा प्रवास सुरू होतो, ही नित्याचीच बाब ठरली आहे. त्यामुळे खड्डे कुठे पडले, खड्ड्यांत कोण पडला याचे काही घेणे-देणे अधिकाऱ्यांना नाही. हे कार्यालय रामभरोसे सोडले, अशा अधिकाऱ्यांवर प्रथम कारवाई होणे गरजेचे असून रस्त्याची दुरूस्ती अत्यावश्यक झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
आमगाव-देवरी मार्ग मृत्यूला आमंत्रण
By admin | Published: October 06, 2016 1:02 AM