निधीची आवश्यकता : अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या भालेसर नाल्याचे काम लोकवर्गणीतून लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा (कोसरा) : आकोट गावाजवळचा भालेसर नाला पूर्णपणे माती, दगडानी बुजला त्यामुळे या नाल्याचे पाणी कोसरा, कोंढा, सेंद्री गावापर्यंत पोहचत नाही म्हणून या गावच्या शेतकऱ्यांना गेल्या ३ वर्षापासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. शेतीला या नाल्याचे पाणी मिळावे यासाठी कोंढा येथील ुउमद्या तरूणांनी लोकवर्गणी व श्रमदानातून हे काम करीत आहेत. सदर काम पूर्ण झाल्यास परिसरातील जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळू शकेल. गोसे प्रकल्पाचा डावा कालवा असलेल्या आकोट गावाजवळ सायफनजवळ भालेसर नाला पूर्णपणे माती झाडे, गवत दगडाने बुजल्याने नाल्याचे पाणी पास होणे बंद झाले होते. डाव्या कालव्याचे पाणी या भालेसरच्या नाल्यात येऊ शकत नव्हते. त्यामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित होते. तीन वर्षांपासून किरण जिभकाटे, ज्ञानेश्वर जिभकाटे, कोसऱ्याचे माजी सरपंच संजय रत्नपारखी, कोंढा येथील ग्रा.पं. सदस्य अमित जिभकाटे यांनी आकोट गावाजवळ असलेल्या भालेसर नाल्याचे खोलीकरण, रूंदीकरण करण्यासाठी जेसीबी मशिन भाड्याने आणून काम सुरू केले. त्यासाठी श्रमदानाची मदत देवून या नाल्याचे खोलीकरण केले. यामुळे मोठा आधार शेतकऱ्यांना होणार आहे. या नाल्याचे काम ३ ते ४ कि़मी. अंतर करणे आवश्यक आहे. निधी अपूरा जात असल्याची कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली. भालेसर नाल्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या शेतकऱ्यांनी आपले योगदान देण्याचे आवाहन संजय कावडे व कार्यकर्ते सतत करीत आहेत. जिल्हाधिकारी, भंडारा यांना भालेसर नाल्यांच्या आजुबाजूला असलेल्या शेतीतून पाण्याअभावी धान व इतर पिकांची उत्पादन घेता येत नाही. सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत होती. ही समस्या आकोट, कोसरा, कोंढा येथील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनात आणून दिली. स्वत: आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी या नाल्यास भेट देवून नाल्याचे खोलीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते. सदर गाव जलयुक्त शिवार योजनेत येत नसल्याने काम होऊ शकत नाही. असे उत्तर मिळाले. भालेसर नाल्याचे खोलीकरणाच्या कामासाठी ध्येयवेड्या कोंढा येथील संजय कावडे यांनी संबधित विभागाला निवेदन दिले. महसूल अधिकाऱ्यांनी यास भेट दिली. पण नाल्याच्या खोलीकरणाचे नियोजन करू शकले नाही. सायफन दुरूस्ती होणे आवश्यक महाराष्ट्र ग्रामीण रोजगारहमी योजनेअंतर्गत नाला खोलीकरण, सरळीकरण, रूंदीकरणाचे काम होत आहेत. भालेसर नाला रूंदीकरण, खोलीकरण व सरळीकरणाचे काम ग्राम पंचायत आकोट, कोसरा व कोंढा यांनी घेणे आवश्यक ठरत आहे. पावसाळ्यात या ना?यातील पाणी ठप्प होते म्हणून शेतातील पाण्याची निकासी होत नाही. चिचाळपासून भालेसर नाला पूर्णपणे बुजला आहे. सायफन असलेल्या ठिकाणी सध्या कालव्याचे पाणी अंडरग्राऊंड दुसऱ्या बाजुस जाते. पण तिथे ६ पैकी एक गेटचे ग्रील पूर्ण करणे असल्याने कालव्यातील नंबर १ च्या गेटमधून पाण्यासोबत कचरा, झाडे, पालापाचोळा वाहून जात असतो. त्यामुळे भालेसरच्या नाल्यात पाणी गोळा होण्यास अडचण निर्माण झाली आहे. सायफनच्या गेटचे काम करण्याकडे डावा कालवा धरण विभाग वाही यांचे दुर्लक्ष होत आहे. गोसे प्रकल्पाचे पाणी डाव्या कालव्यात बाराही महिने सतत पाणी सुरू झाले नाही तर सायफनच्या गेटला असलेली जाळी तुटलेली आहे. ते दुरूस्त होणे आवश्यक आहे. ते झाल्यास हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळू शकते. आकोट, निरगुडी, कोसरा, कोंढा, सेंद्री येथील शेतकऱ्यांना २ हजार हेक्टर शेतीला वरदान ठरणारा भालेसर नाला आहे. शेतकरी कल्याण साधनाऱ्या सरकारच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिल्यास याचे काम पूर्णत्वास जाऊ शकते. ध्येयवेड्या तरूणानी नाला खोलीकरणाचे काम हाती घेतले ते पूर्णत्वास गेले पाहिजेत, अशी अपेक्षा गावकरी करीत आहेत.
दोन हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ शक्य
By admin | Published: May 12, 2017 1:22 AM