कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान होता व त्यामुळे अद्याप येथील प्रकल्पांत भक्कम पाणीसाठा आहे. हे बघता यंदा पाटबंधारे विभागाकडून जिल्ह्यात रबीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. याबाबत कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून यंदा १३८९४ हेक्टरसाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती आजही वरथेंबी आहे. अशात चांगला पाऊस पडल्यास खरिपाचा हंगाम चांगला निघून जातो. शिवाय रबीसाठीही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय पाटबंधारे विभागाकडून करून दिली जाते. अन्यथा खरिपात शेती करायची व रबीत बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याअभावी कोणतेही पीक घेता येत नाही. मात्र, मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाल्याने आजही प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा शिल्लक आहे. यात उन्हाळ्याची सोय करून ठेवल्यानंतरही पाणी शिल्लक राहणार एवढा साठा दिसून येत आहे. याकडे लक्ष देत यंदा जिल्ह्यात रबीसाठी सिंचनाची सोय करण्याचे ठरले आहे. यासाठी नुकतीच कालवे सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. त्यात रबीसाठी सिंचन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, यंदा जिल्ह्यातील १३८९४ हेक्टरला सिंचन केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पाद्वारे ९९३४ हेक्टरचे तर बाघ प्रकल्पातून (पुजारीटोला) ३९६० म्हणजेच एकूण १३८९४ हेक्टरचे सिंचन केले जाणार आहे. रबीसाठी सिंचनाची सोय होणार असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा दुसरा हंगामही फुलणार आहे. विशेष म्हणजे, यांतर्गत आता पाण्याची ३ री पाळी सुरू आहे.
असे करण्यात आले आहे नियोजन सिंचनासाठी करण्यात आलेल्या नियोजनांतर्गत, इटियाडोह प्रकल्पातून ९९३४ हेक्टरचे नियोजन असून यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३५ टक्के म्हणजेच ३४७७ हेक्टर, लखांदूर (भंडारा) तालुक्यातील २५ टक्के म्हणजेच २४८३ हेक्टर तर वडसा व आरमोरी (गडचिरोली) तालुक्यातील ४० टक्के म्हणजेच ३९७४ हेक्टरचा समावेश आहे. तसेच बाघ प्रकल्पातून ३९६० हेक्टरचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ५० टक्के म्हणजेच १९८० हेक्टर, आमगाव तालुक्यातील ३० टक्के म्हणजेच ११८८ हेक्टर तर सालेकसा तालुक्यातील २० टक्के म्हणजेच ७९२ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे.