प्राप्त माहितीनुसार, पुनाजी मेश्राम हे पत्नीसह भंडगा येथे राहतात. त्यांच्याकडे शेळ्या असून, त्यांच्यासाठी जंगलातून चारा आणण्याकरिता पुनाजी हे बुधवारी (दि.२१) दुपारी भंडगा परिसरातील जंगलात गेले होते. दरम्यान, जंगलातून चारा घेऊन परत येत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. दरम्यान, ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. यानंतर, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचे वास्तव्य असून, पंधरा दिवसांपूर्वीच वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर, आता ही घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने वाघाला जेरबंद करून बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे, तसेच पुनाजी मेश्राम यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले असून, वन विभागाने त्यांच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत करण्याची मागणी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.
वाघाच्या हल्ल्यात इसम ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:19 AM