गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात गांजा पुरविणाऱ्या ओडिशा राज्यातील अंगुल जिल्ह्यातील किशोरेनगर तालुक्यातील कडाली येथील अरखित बिम्बांधर बेहेरा (४०) याला रावणवाडी पोलिसांनी अटक करून आणले होते. पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
रावणवाडी पोलिसांनी १४ जुलै रोजी ग्राम कामठा येथील घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (२५) याच्याकडून आठ लाख ४३ हजार रुपये किमतीचा ७० किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करून त्याला अटक केली होती. त्याच्यावर रावणवाडी पोलिसांत मादक पदार्थ विरोधी अधिनियम कलम ८,२० अन्वये गुन्हा दाखल केला होता. अग्रवालकडे विचारपूस केली असता त्याने ओडिशा राज्यातील अंगुल जिल्ह्यातील किशोरेनगर तालुक्यातील कडाली येथील अरखित बेहेरा (४०) हा गांजा पुरवत असल्याचे सांगितले होते. यावर रावणवाडी पोलिसांनी ओडिशा येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले होते. बेहेरा याने गांजा पुरवत असल्याची कबुली दिल्याने त्याला १७ जुलै रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (दि.२०) पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली असल्याची माहिती रावणवाडीचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली आहे.