गोंदिया : शहरातील मालवीय वॉर्ड बाजपाई चौकातील मे. प्रभुदास अटलम या अनाज भंडारमध्ये धाड घालून अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी १९ ऑक्टोबर रोजी ४९८ किलो नकली तूरडाळ जप्त केली. ही कारवाई गोंदियातील अन्न व औषधी प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी एस.एस.देशपांडे यांनी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या डाळीची किंमत ३० हजार ९६ रुपये सांगितली जाते.
शहरातील मालवीय वॉर्ड बाजपाई चौकातील मे. प्रभुदास अटलम या दुकानात नकली तूरडाळ म्हणून विक्री केली जात असल्याची तक्रार अन्न व औषधी प्रशासन कार्यालयाला करण्यात आली. या तक्रारीच्या आधारावर अन्नसुरक्षा अधिकारी शीतल देशपांडे यांनी त्या दुकानावर धाड घालून नकली तूरडाळ विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. त्या दुकानातून ४९८ किलो तूरडाळ जप्त करण्यात आली. तूरडाळ विक्रेता चंद्रकुमार प्रभुदास भक्तानी यांच्यासमोर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली आहे.
पोती डाळीवर उत्पादकाचा नाव व पत्ता नाही
अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या दुकानात धाड घालून तूरडाळ म्हणून विक्री केली जाणारी नकली डाळ ३० किलो वजनाची पोती होती. त्या पोत्यांवर उत्पादकाचा पूर्ण पत्ता नव्हता. त्यावर उत्पादनाचा दिनांक व बॅच नंबर नव्हता.
बटरी डाळीला लावला रंग
तूरडाळ म्हणून विक्री केल्या जाणाऱ्या रंगीत बटरी डाळीला (कलश ब्रॉण्ड) तूरडाळ म्हणून विक्री केले जात होते. त्या डाळीला पिवळा रंग लावला असल्याने ती डाळ पिवळी व छोट्या आकाराची दिसायची. त्यावरून ही नकली डाळ असल्याचा संशय आल्याने कारवाई करण्यात आली.
छत्तीसगडमधून होतो पुरवठा
तूरडाळ म्हणून विकल्या जाणाऱ्या डाळीला छत्तीसगड येथून मागविले जाते. छत्तीसगड येथून येणारी नकली डाळ तुरीची डाळ म्हणून गोंदिया जिल्हाभर विक्री केली जात असल्याची माहिती आता पुढे येत आहे. जप्त करण्यात आलेल्या डाळीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. त्या नमुन्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास अन्नसुरक्षा अधिकारी एस.एस.देशपांडे करीत आहेत.
येथे करा तक्रार
गोंदिया जिल्हावासीयांनो, अन्नपदार्थांविषयी काही तक्रार असल्यास प्रशासनाच्या ई-मेल idiagondia@gmail.com वर संपर्क करावा, असे अवाहन सहायक आयुक्त स.पा.शिंदे यांनी केले आहे