देवरी : बैलपोळा किंवा पोळा हा मराठी सण असून, या दिवशी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. विदर्भात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; पण तालुक्यातील गोधन नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने यंदा पोळ्याच्या दिवशी पूजा करण्याकरिता बैलजोडी न मिळाल्याने नागरिकांमध्ये निराशा पाहायला मिळाली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी बैलांचा पोळा हा कोरोना निर्बंधांमुळे भरलाच नाही. शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळल्याने सध्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर होत असल्याने या भागातील शेतकरी दलालांना मोजक्या भावात गुरांना विकत आहे. ही गुरे प्रत्येक दिवशी कत्तलखान्याकडे जात असल्याने क्षेत्रातील पशुधन घटत चालले आहे. त्याचाच प्रत्यय यावर्षी शहरात पोळ्याच्या दिवशी बघायला मिळाला. शेतकरी बैलजोडी आपल्या घरी पूजेला आणणार अशी वाट पाहत बसलेल्या बऱ्याचशा शहरवासीयांची फार निराशा झाली. शहरात मागील वर्षी बैलजोड्यांची संख्या थोडीफार जास्त होती. परंतु या वर्षी मोजकेच बैल असल्याने शहरवासीयांना बैलांची पूजाच करता आली नाही. करिता पोळ्याची परंपरा कशी टिकवून ठेवायची हाच प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागात लोकांना बैलांची पूजा करण्याचे सौभाग्य लाभले; परंतु शहरात बैल सापडत नसल्याने येणाऱ्या दिवसांत बैलांची पूजा करण्याकरिता ग्रामीण भागांकडे धाव घ्यावी लागणार हे निश्चित. तालुका छत्तीसगडच्या सीमेला लागून असल्याने या तालुक्यात गुरांचा धंदा जोमात चालतो. छत्तीसगडची व तालुक्यातील गुरे एकत्र करून ती नागपूरकडे कत्तलखान्यात दर दिवशी पाठविली जातात. काही वाहनांवर कारवाई होते; परंतु बऱ्याचदा वाहनांतून गुरांना कत्तलखान्याकडे नेले जात असल्याने क्षेत्रातील गोधन झपाट्याने घटत आहे. हे गोधन वाचावे याकरिता नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.