गोंदिया : शहरालगत असलेल्या कुडवा परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, सैनिक शाळा, आयुर्वेदिक महाविद्यालय, अन्य विविध शैक्षणिक संस्था आणि आता आयटी कंपनीचे मुख्यालय सुद्धा याच भागात होत असल्याने या परिसराच्या वैभवात भर पडली आहे. आयटी, एज्युकेशन, हेल्थ हबने गोंदिया शहराचे चित्र बदलत असून, भविष्यात यातून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांत गोंदिया शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शहरात अधिक विस्ताराला वाव नसल्याने शहराला लागून असलेल्या कुडवा, फुलचूर, बालाघाट रिंगरोड, गोंदिया-आमगाव मार्ग या परिसराचा अधिक विस्तार होत आहे. सहा महिन्यांपूर्वी शहरातील कुडवा परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेजच्या इमारतीच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर याच भागात एका आयटी कंपनीने आपल्या मुख्यालयाचे काम सुरू केले आहे. या आयटी कंपनीत पहिल्या टप्प्यात ५०० आणि दुसऱ्या टप्प्यात ५०० अशा एकूण १००० युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आयटी कंपनीचे मुख्यालय गोंदियात सुरू होणे ही खरोखरच उच्च व तंत्र शिक्षण घेणाऱ्या युवकांसाठी रोजगाराची दारे उघडून देणारी संधी आहे. तर याच परिसरात विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे विस्तारीत आहे. त्यामुळे या परिसरात एज्युकेशन हब निर्माण होत आहे. शिवाय त्यात आता आयटी पार्कची भर पडली आहे.
विशेष म्हणजे या सर्व गोष्टींच्या विकासामुळे या परिसरातील जमिनीचे दर आकाशाला भिडले आहेत, तर स्थानिकांना विविध माध्यमांतून या ठिकाणी रोजगार मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गोंदियाकरांसाठी ही गौरवाची बाब आहे. रेल्वे जंक्शन आणि धानाच्या अधिक उत्पादनामुळे राईस सीटी, अशी ओळख असलेल्या गोंदिया शहराला एज्युकेशन हब ही नवी ओळख प्राप्त होत आहे.
जमिनीचे दर आकाशालाशहरालगत असलेल्या कुडवा परिसराचा झपाट्याने विकास होत असल्याने या भागातील जमिनीचे दर आकाशाला भिडले आहे. त्यामुळे या परिसरात सर्वसामान्य व्यक्ती जमीन घेण्याचा विचारही करू शकत नाही.
बिरसी येथे पायलट प्रशिक्षण केंद्रगोंदिया तालुक्यातील बिरसी येथे आंतर- राष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून, या विमानतळावरून प्रवासी सेवेला सुरुवात झाली आहे, तर याच ठिकाणी इंदिरा गांधी उडाण अॅकडमी रायबरेलीचे पायलट प्रशिक्षण केंद्र असून, या ठिकाणी ४० वर अधिक पायलट प्रशिक्षण घेत आहेत.
रिंगरोड परिसरातून जाणार समृद्धी मार्गमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गोंदिया ते नागपूर हे अंतर दोन तासांत आणि गोंदिया ते मुंबई हे अंतर आठ ते दहा तासांत गाठणे शक्य होणार असल्याने शेतीसह अन्य व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हा मार्ग सुद्धा कुडवा परिसरातील रिंगरोड येथून जाणार आहे. त्यामुळे परिसराचे महत्त्व अधिक वाढणार आहे.