गोंदिया : मानवी जीवनात शिक्षणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा मूलभूत अधिकार मानवी जीवनास मिळालेली अमूल्य देण आहे. जीवनात चांगले शिक्षण घेतले तर आपण उच्चपदापर्यंत जाऊ शकतो व त्याची समाजात प्रतिष्ठा वाढत असते. त्याचप्रमाणे चांगले आरोग्य राहण्यासाठी चांगल्या गुणांचा अवलंब केला तर आरोग्य सुदृढ राहते. चांगले आरोग्य हे एक चांगले व्यक्तिमत्त्वाचे गुण आहे. समाजातील तळागळातील लोकांना जे दीर्घ काळापासून गरीब व उपेक्षित आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी केले.
भटके विमुक्त कल्याणकारी संस्था विदर्भ प्रदेश अंतर्गत ‘पालावरची शाळा’ मांग, गारुडी वस्ती, शिवाजीनगर, कुडवा (गोंदिया) येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा न्यायाधीश-१ एस. बी. पराते, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी. बी. कटरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, तहसीलदार आदेश डफळ, गट विकास अधिकारी दिलीप खोटेले, ॲड. हेमलता पतेह, ॲड. अर्चना नंदघळे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, पालावरच्या शाळेचे निर्मल बोरसे, कुडवा ग्रामपंचायत सरपंच शामदेवी ठाकरे व ॲड. प्रणिता कुलकर्णी उपस्थित होते.
न्या. औटी यांनी भटक्या विमुक्तांना शासनाच्या विविध योजनांची विस्तृतपणे माहिती दिली. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना शासनाच्या योजनांचा कसा लाभ घेता येईल याबाबत सविस्तर समजावून सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत विविध सेवा पुरविल्या जातात व त्या मोफत असतात. त्यामुळे त्या योजनांचा कसा लाभ घेता येईल मार्गदर्शन केले. भटक्या विमुक्त लोकांना तसेच पालावरच्या शाळेतील मुलांना मार्गदर्शन करतांना मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. भट्टाचार्य म्हणाले, आपण उद्याचे सुजाण नागरिक आहात. त्यामुळे चांगल्या आचरणातून आपण मोठे व्यक्ती व्हावे, ज्यामुळे आपले नाव समाजात एक उत्तम उदाहरण म्हणून नावारूपास येईल. संविधानामध्ये शिक्षण घेण्याच्या अधिकाराबाबत मुलांना वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत मोफत शिक्षण देण्यात यावे व ही जबाबदारी शासनाची आहे. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणे हे त्यांचे कर्तव्ये आहे व शिक्षण देवून त्यांना या देशाचा सुजाण नागरिक बनविणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रणिता कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड. हेमलता पतेह यांनी मानले.