गोंदिया : कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले व या केंद्रचालकांना शासनाकडून प्रति थाळी अनुदान ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात २४ केंद्रांच्या माध्यमातून गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत ४,५८,७१८ नागरिकांनी भोजन देण्यात आले. मात्र या केद्रचालकांना मागील २ महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. परिणामी गरजूंचे पोट भरणाऱ्यांवरच आता उपाशी राहण्याची पाळी आली असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गरजूंना खरेच मोठा आधार झाला व त्यांच्या २ वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. आताही शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची सोय सुरूच आहे. मात्र केंद्रचालकांना अनुदान मिळाल्याने त्यांना ही सर्व व्यवस्था करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. परिणामी ते आता आर्थिक अडचणीत आले आहेत.
--------------------------------
- जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र- २४
- आतापर्यंत किती जणांनी लाभ घेतला - ४५८७१८
-------------------------------
प्रति थाळी ५० रुपये अनुदान
केंद्र चालकाने लाभार्थ्याकडून ५ रुपये घेतल्यास त्याला ४५ रुपये तसेच जर १० रुपये घेतले तर ४० रुपये अनुदान दिले जाते. मात्र सध्या नि:शुल्क थाळी वितरण करावे लागत असल्याने एका थाळीवर ५० रुपये अनुदान दिले जात आहे.
---------------------------------
अनुदान रखडले तरीही थाळींचे वितरण तेवढेच
राज्य शासनाने शिवभोजन केंद्रांना एक कोटा ठरवून दिला आहे व त्यानुसार त्यांना थाळींचे वितरण करावयाचे असून त्यावरच अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्या गरजूंना नि:शुल्क भोजन वाटपासाठी २४ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना मागील २ महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. मात्र तरीही या सर्व केंद्रांकडून त्यांना ठरवून देण्यात आलेल्या थाळींच्या कोट्यानुसार थाळींचे वाटप सुरूच आहे. अनुदान रखडले म्हणून थाळींची संख्या कमी करण्यात आल्याचा प्रकार कुठेच सुरू नाही.
------------------------------
केेंद्रचालक म्हणतात...
शासन आदेशानुसार केंद्रातून गरजूंना नि:शुल्क थाळी दिली जात आहे. त्यात आम्ही अनुदानामुळे काहीच कमी-जास्त केले नाही. गरजूंना आमच्या माध्यमातून काही फायदा होत आहे याचेच समाधान आहे.
केंद्रचालक
--------------------------
अनुदान रखडले असले तरीही शिवभोजन थाळीचे वितरण सुरूच आहे. त्यात आम्ही थाळींची संख्या कमी केलेली नाही. अनुदान मिळणारच आहे, मात्र लोकांना जेवणाची सोय होत आहे हे महत्त्वाचे आहे.
- केंद्रचालक
---------------------------
कोट
जिल्ह्यात २४ शिवभोजन केंद्रे सुरू असून त्यांच्या माध्यमातून गरजूंना थाळींचे वितरण केले जात आहे. या केंद्रांचे २ महिन्यांचे अनुदान द्यायचे आहे. शासनाकडून अनुदान आले असून प्रक्रिया झाल्यावर लगेच त्यांचे अनुदान दिले जाणार आहे.
- डी.एस. वानखेडे
जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया