बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाचा पाणी जवळच्या बोंडगावदेवी परिसरातील २० ते २५ गावांना मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन येथील सामाजिक कार्यकर्ते शेषराव महाराज, व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंत ऊके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला खा. रामदास आठवले यांनी मुंबई येथे दिले.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील इटियाडोह धरण हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सन १९६५ मध्ये धरणाची निर्मिती करण्यात आली. १९७३ पासून धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. ६३.५० दशलक्ष चौ.मी. पाण्याखाली क्षेत्र असून ३८१, ५८७ दशलक्ष घनमीटर एवढी क्षमता आहे. सदर धरणाचे पाणी गोठणगावपासून गडचिरोली जिल्ह्यात ८० ते ९० कि.मी. प्रवास करीत आरमोरीच्या शेतीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु धरणापासून जवळच असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी परिसरातील १५ ते २० खेडेगावांना इटियाडोह धरणाच्या पाण्यापासून आजतागायत वंचित राहावे लागत आहे. परिसरातील शेतकऱ्यांना शेती हाच एकमेव पर्याय आहे. जलसिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने पाण्याच्या अभावाने धान उत्पादनापासून मुकावे लागत आहे. शेतीमधून मनाजोगे पीक घेण्यासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची नितांत गरज असते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेताला धरणाचे पाणी मिळावे यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी जलसंपदा मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, मुकुल वासनिक, माजी ऊर्जामंत्री राजेंद्र मुळक, जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून परिसरातील शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने निवेदन दिले.शेतकऱ्यांच्या मागणीला बळ यावे यासाठी आरपीआय (आ.) राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांची त्यांच्या मुंबई निवासस्थानी भेट घेवून धरणाचे पाणी बोंडगावदेवी परिसरातील शेतीला मिळावे यासाठी चर्चा करून निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणी संबंधाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन खा. आठवले यांनी शिष्टमंडळास दिले. या वेळी व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंत उके यांच्या नेतृत्वात उपसरपंच माधोराव झोळे, राजू ठवरे, रामटेके, संजय बुटले, कमलेश रामटेके आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. (वार्ताहर )
इटियाडोहचे पाणी बोंडगावदेवीला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार
By admin | Published: November 26, 2015 1:47 AM