लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धो-धो बरसल्यानंतर आता मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे रोवणी धोक्यात आली आहे. परिणामी शेतकरी चिंतेत असून रोवणी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. यामुळे सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पांचे पाणी सोडले जात आहे.मध्यंतरी वरूणराज चांगलेच बरसले होते. त्यामुळे रोवणीची कामे जोमात झाली. मात्र आता मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अचानक पावसाने दडी मारल्यामुळे झालेल्या रोवणीला पाण्याची गरज आहे. तर ज्यांची रोवणी झाली नाही त्यांनाही रोवणी करण्यासाठी पाण्याची गरज आहे. मात्र पाऊस बरसत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत अडकला आहे. मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने पुर्ण हंगाम हातून निघाला होता. यंदाही तीच परिस्थिती निर्माण तर होणार नाही अशी चिंता त्यांना भेडसावत आहे. अशात प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत २७ जुलैपासून इटियाडोह प्रकल्पातून पाणी कालव्यांत सोडले जात होते. तर ३ तारखेला विभागाने पाणी सोडणे बंद केले होते. मात्र स्थिती बघता पुन्हा ३ तारखेला दुपारी १२ वाजतापासून पाणी सोडले जात आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातून ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. इटियाडोह प्रकल्पातून अर्जुनी-मोरगाव तालुक्याला सिंचन होत आहे.मात्र अन्य भागात पाण्याची गरज असल्याने आता पुजारीटोला प्रकल्पातूनही पाणी सोडले जात आहे. पुजारीटोला प्रकल्पातील डावा व उजव्या कालव्यातून प्रत्येकी २०० क्युसेक सोडले जात आहे. यात पुजारीटोला प्रकल्पातून सालेकसा, आमगाव व गोंदिया तालुक्यातील शेतीला पाणी मिळणार आहे. शिवाय लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील काही शेतीलाही यातून सिंचन होणार आहे. उल्लेखनीय असे की, ३ तारखेपासूनच दोन्ही प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे.धापेवाडाचेही पाणी सोडलेतिरोडा तालुक्यातील ग्राम कवलेवाडा जवळ वैनगंगा नदीचे पाणी धापेवाडा प्रकल्पात अडविले जाते. या प्रकल्पातून तिरोडा तालुक्यातील १३ गावांना कालव्यांच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे. शनिवारी (दि.४) दुपारी १२ वाजतापासून पाणी सोडले जात आहे. मागील काही दिवसांत या प्रकल्पातील २३ द्वारांतून पाणी सोडले गेले होते. परिणामी प्रकल्पात फक्त १.५० टक्के पाणी उरले होते. तर आता त्यात सुमारे ९ टक्के पाणी आहे. अचानक पुन्हा ३ द्वार ०.३० सेमी पर्यंत उघडण्यात आले असून पाणी सोडले जात आहे. रविवारी (दि.५) सकाळी १ द्वार बंद करण्यात आले. याशिवाय बोदलकसा टप्पा-१ मधील दोन पंपांनी शेतीला पाणी सोडले जात आहे. ५२.८ क्यु. पाणी शेतीसाठी सोडले जात असल्याची माहिती आहे. यातून तिरोडा तालुक्यातील चार हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार आहे.
सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोलाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:23 AM
धो-धो बरसल्यानंतर आता मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे रोवणी धोक्यात आली आहे. परिणामी शेतकरी चिंतेत असून रोवणी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. यामुळे सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पांचे पाणी सोडले जात आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाने मारली दडी : पाण्याअभावी शेतकरी चिंतेत