दिलीप चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: गोरेगाव तालुक्यातील बागळबंध येथील काली माता मंदिर परिसरातील एका बोरवेलचे पाणी प्यायल्यास जिभेचा रंग काळा होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. काहींना हा निसर्गाचा चमत्कार वाटतो आहे तर काहीजण नवरात्रीच्या पर्वावर असलेली ती देवीची किमया असल्याचे मानत आहेत. १ ऑक्टोबर रोजी हा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला आहे.
तालुक्यातील बागळबंद जंगल परिसरात गोरेगाव तिरोडा मार्गावर काली माता मंदिर आहे. या मंदिराजवळ एक बोरवेल आहे. भाविकांना तहान लागल्यास याच बोरवेलचा आधार घेतला जातो. या काली माता मंदिरला लागूनच फुटक्या तलाव आहे. काही वर्षांपूर्वी या तलाव परिसरात लग्न सोहळा पार पाडण्यासाठी वरात गेली होती. मात्र अधिक रात्र झाल्याने त्या वरातीतील सर्वांनी फुटक्या तलावाजवळ मुक्काम केला होता. पण त्याच रात्री तलावाची पाळ फुटल्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासूनच त्या तलावाचे नाव फुटक्या तलाव पडल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर पहाडीवर काली मातेचे मंदिर उभारण्यात आले. आज घडीला सदर काली माता मंदिर परीसरात भक्त येत असतात. या पहाडीवर काळ्या रंगाचे दगड आहे. या दगडाना फोडण्याचे काम खाडीपार येथील युवकाने खुप वर्षांपूर्वी सुरू केले होते, गावक-यानी त्या युवकाला दगड तोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण युवकाने काहीच ऐकले नाही. काही दिवसात त्या युवकाचे निधन झाल्याचे जुने लोक सांगतात
हे कालीमंदीर १५० वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. स्थानिक लोकांनी या काली माता मंदिर परिसरात काही मंदिरे बांधली आहे. तर १९९७ मध्ये पंचायत समितीचे माजी सभापती विजय राणे यांनी या मंदिर परिसरात एका बोरवेलची व्यवस्था केली होती. त्यामुळे या मंदिर परीसरात येणा-या भाविकांना या बोरवेलचा मोठा आधार असतोे. मात्र 1 आॅक्टोबर रोजी या बोरवेलचे पाणी प्यायल्याने जिभेचा रंग काळा होत असल्याचा प्रकार परिसरात वा-यासारखा पसरला. हा नेमका काय प्रकार आहे याची शहानिशा करण्यासाठी अनेक भाविकांनी येथे गर्दी केली. पाणी घेतले तर अनेकांची जिभेचे रंग काळा होत असल्याचा प्रकार पुढे आला. अनेकांनी हा दैवी चमत्कार वाटतो तर काहींना निसर्गाची किमया, मात्र नेमका काय प्रकार आहे या विषयी नाना चर्चा ऐकायला मिळत आहे. या बोरवेलच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाहणी केल्यास नेमका काय प्रकार आहे ते कळेल असे माजी सभापती विजय राणे यांनी लोकमतला सांगितले.