संतोष बुकावनलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : धान भरडाईची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. राईस मिलर्स धान नियतानाशिवाय तांदूळ जमा करून स्वीकृती पावत्या घेत आहेत. यामुळे हंगामातील खरेदी झालेल्या धानापेक्षा जास्त क्विंटलच्या स्वीकृत पावत्या जमा होण्याची शक्यता आहे. पावत्यांच्या बदल्यात राईस मिलर्सना तेवढे धान उपलब्ध करून देण्याचे संकट प्रशासनासमोर उभे ठाकणार आहे. अधिकाऱ्यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका आणि प्रशासनाची डोळेझाक या निमित्ताने समोर आली आहे.अजूनही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सीएमआर स्वीकृत केंद्रांवर तांदूळ घेणे सुरूच आहे. येथील नियुक्त गोदामपालांवर कारवाईची मागणी केली जात आहे. अर्जुनी मोरगाव येथे धानाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शासनाच्या आधारभूत किमतीने मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी केली जाते. या हंगामात मार्केटिंग फेडरेशनकडे १० लक्ष २७ हजार ८८७ क्विंटल शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धानसाठा शिल्लक आहे. आदिवासी महामंडळाची आकडेवारी कळू शकली नाही. या न एजन्सीमार्फत राईस मिलर्सला भरडाईसाठी नियतन दिले जाते. नियतन प्राप्तीनंतर राईस मिलर्स मोबदल्यात शासनाला तांदूळ देतात. भरडाईची मुदत ३० सप्टेंबरलाच संपली आहे. तरीदेखील अर्जुनी मोरगाव तालुक्यात तांदूळ घेण्याचा गोरखधंदा सुरूच आहे. सीएमआर स्वीकृती केंद्रावर राईस मिलर्सकडून अलॉटमेंट न पाहता तांदळाचे लॉट स्वीकारले जात आहेत. यात अधिकाऱ्यांचे हात चांगलेच ओले झाले आहेत. यासंदर्भात मार्केटिंग फेडरेशन, आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना जाणीव आहे. संबंधित यंत्रणेला त्यांनी तसे आदेशही निर्गमित केले आहेत. या पत्रात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राईस मिलर्स धानाच्या नियतनाशिवाय स्वीकृती पावत्या तयार करून जमा करीत असल्याचे नमूद आहे. माहिती असूनही केवळ कागदी घोडे रंगविले जात आहेत. कारवाई मात्र काहीच नाही. बुधवारी सदर प्रतिनिधीने किसन अग्रवाल यांनी किशोर शहारे यांचेकडून भाड्याने घेतलेल्या गोदामात भेट दिली असता गोदामातील तांदूळ ट्रकद्वारे नेणे सुरू होते. हा गोदाम पूर्णतः रिकामा करण्यात आला. येथे नवेगावबांधचे पुरवठा अधिकारी माहुरे कर्तव्यावर होते.
धानाला राजकीय रंग- धानाच्या या सर्व खेळखंडोब्याला राजकीय रंग आहे. राजकीय बळाचा वापर करून अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याचे काम केले जाते. अधिकारी बचावात्मक आदेश काढून सवलत देतात. ओरड झाली की एकमेकांचा बचावही करतात. या व्यवसायात हे कारनामे प्रदीर्घ काळापासून सुरू आहेत. गॉडफादर असल्याने अधिकारीसुद्धा त्याच पद्धतीने वागत असल्याचे जाणवते.