तिरोडा : तालुक्यातील जागृती सहकारी पतसंस्थेच्या दोषींवर कारवाई करून ठेवीदारांच्या कोट्यवधीच्या ठेवी परत करण्याची ग्वाही गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी ठेवीदारांना दिली.
तिरोडा तालुक्यातील कोट्यवधीच्या ठेवी असलेल्या जागृती सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधीच्या ठेवी हडपून संचालक मंडळ आपल्या जबाबदारीपासून पळवाट शोधत आहे. याप्रकरणी निबंधक कार्यालयाच्या वतीने संस्थेत घोळ झाल्याचेसुद्धा लेखा तपासणीत स्पष्ट झाले आहे. मात्र, याप्रकरणी पोलीस प्रशासनाच्या वतीने हितसंबंधी राजकारण्यांच्या दबावाखाली येऊन थातूरमातूर चौकशी केली जात आहे. याकडे पालकमंत्री नवाब मलिक यांचे लक्ष वेधून दोषींवर कारवाई करण्याची व ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर पालकमंत्री मलिक यांनी लगेच पोलीस अधिकाऱ्यांना बोलून कडक कारवाईचे निर्देश दिले. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
शिष्टमंडळात अरुण कडवं, रितेश गहेरवार, पूनम बैस, शहारे, एन.जी.मेश्राम, डी.बी.गडपायले, आशू पटले, प्रतिभा गायकवाड, भास्कर गायकवाड, रमण नागपुरे, पेलागडे, वाखले यांचा समावेश होता.