गोंदिया : येत्या निवडणुकांना घेऊन राजकारणात अनेक शंका-कुशंकांना पेव फुटले होते व विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यावर आता विराम लावणे गरजेचे असल्याने ‘जनता की पार्टी’ची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर येत्या निवडणुका ‘जनता की पार्टी’ स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा आमदार विनोद अग्रवाल यांनी केली.
पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सोमवारी (दि.१३) घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर व शहर अध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी ग्रामीण मंडल व शहर कार्यकारिणी जाहीर केली. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, या दोन वर्षांत एक हजार कोटींच्या विकासकामांना मंजूर करण्यात यश आले असून यामध्ये ५०० कोटींच्या कामांची निविदा झाली असल्याचे सांगितले. कोरोनामुळे कामांना वेळ लागला तरीही येत्या वर्षात हे काम जनतेला दिसणार. विशेष म्हणजे, कामांच्या निविदा प्रक्रियेत आम्ही शासनाचे १०० कोटी रुपये वाचविले आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा संपत्ती हस्तांतरण अधिनियमात समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा केला व त्याचे फलित मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.