कपिल केकत (लोकमत विशेष)
गोंदिया : मागील २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून अवघ्या देशात जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. तेव्हापासून देशात कोरोना लढ्याला सुरूवात झाली होती. आता सोमवारी (दि. २२) त्याला वर्षपूर्ती होत आहे. या वर्षभरात जिल्ह्यात आतापर्यंत १५,०८७ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असून दररोज बाधितांची ही आकडेवारी वाढतच चाचली आहे. अशात मात्र २८ जानेवारी हा दिवस जिल्ह्यासाठी ‘गोल्डन डे’ ठरला आहे. या दिवशी जिल्ह्यात ‘झिरो पेशंट’ची नोंद घेण्यात आली असून कोरोनाच्या या दहशतीच्या कालावधीत हा एकमात्र दिवस जिल्हावासीयांसाठी सुखद ठरला.
मागील वर्षी जानेवारी महिन्यात देशात कोरोनाचा शिरकाव झाला होता. मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण नसल्याने घाबरण्याची गरज नव्हती. मात्र मार्च महिना लागताच बाधितांची संख्या वाढू लागली व त्यानंतर जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. कोरोनाच्या या विळख्यातून गोंदिया जिल्हाही स्वत:ला जास्त काळ वाचवून ठेवू शकला नाही व २४ मार्चच्या लॉकडाऊननंतर लगेच २७ मार्च रोजी जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद घेण्यात आली. त्यानंतर कोरोना बाधितांचे जे सत्र सुरू झाले ते अविरतपणे अजूनही सुरूच आहे.
येत्या २७ मार्च रोजी जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधिताची वर्षपूर्ती होत असून १ रुग्णापासून या वर्षभरात बाधितांची संख्या १४,९९५ एवढी झाली आहे. अवघे वर्ष कोरोनाच्या साथीत निघून गेले व दररोज कोरोना बाधितांचे कधी कमी तर कधी जास्त आकडे कानी पडत होते. मात्र कोरोना विळख्यातील या वर्षभरात २८ जानेवारी रोजी जिल्ह्यात ‘झिरो पेशंट’ची नोंद घेण्यात आली होती. यामुळे २८ जानेवारी हा दिवस जिल्हावासीयांच्या कायम लक्षात राहण्यासारखा दिवस ठरला असून या दिवसाला ‘गोल्डन डे’ म्हणून संबोधणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
----------------------------------
जनता कर्फ्यूची आज वर्षपूर्ती
देशात कोरोनाचा वाढता विळखा बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. मागील वर्षी २२ मार्च ही तारीख रविवारी आली होती. यंदा सोमवारी येत असून जनता कर्फ्यूला वर्षपूर्ती होत आहे. जनता कर्फ्यूच्या घोषणेनंतरच अवघ्या देशवासीयांना कोरोना काय ते कळून आले होते. जिल्ह्यासाठीही हीच बाब लागू पडत असून फरक एवढाच की मागील वर्षी जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता. यंदा मात्र जिल्ह्याने १५ हजारांचा आकडा गाठला आहे.
---------------------------------
जिल्हावासीयांनी साथ देण्याची गरज
पंतप्रधान मोदी यांच्या जनता कर्फ्यूला तसेच त्यानंतर लॉकडाऊनला जिल्हावासीयांनी साथ दिल्याने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्याची स्थिती चांगलीच राहिली. यात रुग्ण व रुग्णांचे मृत्यू या स्थितीला जिल्ह्याने उत्तमरीत्या हाताळले आहे. आता तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होत आहे. अशात कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पुन्हा जिल्हावासीयांची साथ जिल्हा प्रशासनाला हवी आहे. यातूनच कोरोना आपले पाय घट्ट रोवू शकणार नाही हे प्रत्येकाने लक्षात घेण्याची आता खरी गरज आहे.