गोंदिया: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जय दिलीप खानोलकर (२०) रा. गांधी वाॅर्ड, गोंदिया व आतिश छगन मेश्राम (२१) रा. चुलोद, ता. जि. गोंदिया या दोघांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दाेन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आता त्या आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात १६ ते २० तारखे दरम्यान दरम्यान सहयोग कॉलनी गौरीनगर, गोंदिया परिसरातून एका बंद घराचे मागचे दाराचे लॉक तोडून आलमारीमधून सोन्याची साखळी,अंगठी, कानातील रिंग, काही सामान आणि रोख रुपयाची चोरी केल्याचे सांगितले. या गुन्ह्यामध्ये चोरी केलेले सोने विकण्याकरिता अडचण येऊ नये म्हणून एका कारागिराकडून वितळवून त्याची लगड बनवून घेतली होती. सहयोग कॉलनी गौरीनगर, गोंदिया येथील नीलेश मारोतराव उईके यांच्या घरून चोरी केल्यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात १७ जानेवारी रोजी भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी भंडारा येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.